नेरीदिगरला काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा लाखोंचा रेशनचा तांदूळ जप्त

0
71

जामनेर : प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील नेरी दीगर येथे तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला एक लाख साठ हजार रुपयांचा ११८ गोण्या रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आला. काळ्या बाजारात विक्रीसाठी हा तांदुळ जाणार होता. या प्रकरणी पुरवठा निरीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलिसांत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांदळासह वाहन (बोलोरो पिकअप) जप्त करण्यात आले आहे.
जामनेर तालुक्यातील तहसीलदार नानासाहेब आगळे यांना (दि. २०) गुप्त माहिती मिळाली की, रेशन दुकानाचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात आहे. त्यांनी तलाठी नितीन मनोरे, अजय गवते, चेतन ताथे, अभिलाष ठाकरे, प्रमोद इंगळे, राजेश देवले, गोदाम व्यवस्थापक अशोक सोनवणे यांना तात्काळ बोलवून त्यांना माहिती देऊन गोडाऊनवर छापा टाकण्याचे सांगितले. दोन खाजगी वाहनाने दोन पथके जामनेर तालुक्यातील निरीदिगर येथे पोहोचले. त्या ठिकाणी जळगाव रोड लगत भोळे नगर परिसरात कांतीलाल राखबचंद जैन यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये रेशन दुकानात तांदूळ साठवलेला मिळून आला. तो काळा बाजारात विक्रीसाठी पिकअप व्हॅन मध्ये भरण्यात येत होता. त्यावेळी तलाठी यांनी तो सर्व तांदूळ जप्त केला. रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पोलिसांनी ही कारवाई केली.
या छाप्यामध्ये ११८ तांदुळाच्या गोण्या मिळून आल्या. त्याचबरोबर दोन लाख रुपयांची बोलोरो पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कांतीलाल जैन व सुकलाल नेमाडे पिकअप चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here