नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेतल्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन खासदारांनी चर्चेची मागणी केली.त्यानंतर काल लोकसभा आणि राज्यसभेतल्या खासदारांचे निलंबन करण्यात आले. त्यापाठोपाठ आजही निलंबन करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत संसदेतले १४१ खासदार निलंबित झाले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेही आहेत. सुप्रिया सुळे यांनी निलंबनानंतर ही अघोषित आणीबाणी आहे असे म्हणत पोस्ट लिहिली आहे.
दुष्काळ आणि सरकारच्या धोरणांमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कांदा-कापूस-सोयाबीन-दूधाच्या दरांचा प्रश्न सरकारला विचारायचा नाही तर कुणाला विचारायचा? शेतकऱ्यांचे म्हणणे जर सरकारपर्यंत मांडायचेच नसेल, बेरोजगारांची घुसमट सरकारला ऐकायचीच नसेल, महिला-मध्यमवर्गीयांचे प्रश्न या सरकारला ऐकायचेच नसतील तर ते मांडायचेच नाहीत का ? आणि जर हे प्रश्न मांडले तर ते सभागृहातून बाहेर काढतात.
संसदेच्या सुरक्षेत नेमकी काय चूक झाली याबद्दल प्रश्न विचारणे भाजपाच्या राज्यामध्ये गुन्हा आहे का ? हा प्रश्न विचारणाऱ्या १४१ खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी निलंबित केले आहे. भाजपा सरकारने आज माझ्यासह आणखी ४९ खासदारांना संसदेतून निलंबित केले. सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहे हे स्पष्ट आहे तसेच काही महत्वाच्या विधेयकांना चर्चेेविनाच मंजूर करण्याचा भाजपाचा डाव आहे. चार महत्वाची विधेयके चर्चेला येणार होती. परंतु सरकारमध्ये विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची हिंमत नाही. त्यांनी त्यांना सभागृहातूनच निलंबित करण्याचा सोपा मार्ग निवडला. म्हणजे ही अघोषित आणीबाणी आहे. जनतेचा आवाज दडपण्याचे पाप हे सरकार करतेय आणि म्हणूनच आम्ही सर्वजण या दडपशाहीच्या विरोधात ठामपणे एकजूटीने उभे आहोत.
