संसदेत दोन प्रेक्षकांनी घातला गोंधळ

0
51

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून काल बुधवारी लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात व्यक्ती सभागृहात शिरले. प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात आले. सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात आले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या दोघांना पकडण्यास सांगितले. काही खासदार या दोघांना पकडण्यासाठी धावले. दरम्यान, पिठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली होती.
गोंधळ पाहून सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंतही बाहेर आले. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. सावंत यांनी सभागृहात घडलेल्या घटनेची माहिती देताना सांगितले की, लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोन जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. एका खांबाच्या मदतीने ते प्रेक्षक गॅलरीतून खाली आले. दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते. तेवढ्यात त्यातल्या एकाने बूट काढले, तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या इसमालाही पकडले. त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला. पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता. तो गॅस कसा आला ते माहिती नाही. पण या गॅसमुळे नाकाला आणि डोळ्यांना त्रास होत होता. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतले आहे.खासदार दानिश अली म्हणाले, तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणा हे दोघे देत होते. प्राथमिक माहितीनुसार म्हैसूरचे कोणीतरी खासदार आहेत त्यांच्या पासवर हे दोघे प्रेक्षक गॅलरीपर्यंत आले होते. या खासदाराला चौकशीसाठी बोलावलं आहे.

नेमकं काय घडले?
हे दोन जण सभागृहात धावत असताना खासदारांनी त्यांना पकडले. त्याआधी या दोघांनी बूटातून काहीतरी काढले आणि सभागृहात धूर पसरू लागला. त्यांनी ‘स्मोक कॅन’चा वापर केला असावा असे सांगितले जात आहे. त्याचवेळी खासदारांनी या दोघांना पकडून चोप दिला. त्यापैकी एकाचे नाव सागर असे सांगितले जात आहे. म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह यांच्या मदतीने या दोघांनी प्रेक्षक सभागृहाचा पास (परवाना) बनवून घेतला होता. दरम्यान, सभागृहात हा प्रकार सुरू असताना संसदेच्या बाहेर एक महिला घोषणा देत होती. या महिलेलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
लोकसभेत घटनेचा विधानसभेत परिणाम, आमदारांना मिळणार फक्त २ पास
नागपूर : लोकसभेत घडलेल्या घटनेचा परिणाम देशातील इतर विधानसभांवरही दिसून येत आहे. विधानपरिषदेच्या उपसभापतींनी विधानसभेची सुरक्षा लक्षात घेऊन व्हिजिटर गॅलरीत प्रेक्षकांची संख्या मर्यादित ठेवली आहे. ज्या अंतर्गत आता फक्त मर्यादित प्रेक्षकांना परवानगी असेल. आता आमदारांना दोनच पास दिले जाणार आहे. अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विधान परिषदेच्या उपसभापतींनी यासंदर्भात सूचना दिल्या. दिल्ली लोकसभेच्या गॅलरीतून दोन जणांनी उडी मारली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. विधानपरिषद विधानसभा परिसरात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना वरिष्ठांकडून तत्काळ सूचना दिल्या जात आहेत.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही बाब विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून दिली. असा प्रकार विधिमंडळातही होऊ शकतो. त्यामुळे याप्रकरणी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी, असे सांगितले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही बाब गांभीर्याने घेत. आवश्यक तेवढेच पास देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत येणाऱ्या गर्दीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, मी सभागृहात आलो तेव्हा. लॉबीमध्ये एवढी गर्दी होती की आम्हाला नीट चालताही येत नव्हते. त्यामुळे पासचे वाटप कमी करा, असे ते म्हणाले. उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनीही ही घटना गांभीर्याने घेत अभ्यागतांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचे निर्देश दिले. विधान परिषदेतील गॅलरी पास आजपासून बंद करण्यात येत आहे. अभ्यागतांना सभागृह गॅलरीत प्रवेश नसेल. असे निर्देश विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here