वाशिम : प्रतिनिधी
आपण राम फळ, सीताफळ पाहिले असेल, पण आता हनुमान फळही शेतकरी उत्पादीत करू लागले आहेत. सीताफळ आणि राम फळ याच प्रजातीचे हे फळ आहे. ते आकाराने देखील मोठं आणि चवीलाही अत्यंत गोड आहे. मागील २० वर्षांपासून या फळाची यशस्वी शेती वाशिम जिल्ह्यातील असोला गावातील शेतकरी विठ्ठलराव बरडे हे करतात. अत्यंत कमी पाण्यात येणारं हे पीक आहे. कोणतेही रासायनिक खत किंव्हा फवारणीची याला गरज नसते, असं ते सांगतात.
या फळांचे शास्त्रीय नाव ऍनोना २ असे असून स्थानिक भाषेत त्याच्या आकारामुळे त्याला हनुमान फळ असं नाव पडलंय. या फळात कँसर प्रतिरोध औषधी गुणधर्म असल्याचंही सांगितलं जातं. तर इतरही आजारांवर हे फळ गुणकारी आहे. या फळांचे आवरण जाड असल्याने तोडणी नंतर पाच ते सहा दिवस हे फळ चांगले टिकून राहते. त्यामुळे वाशिम शहरासह,मुंबई पुण्यालाही पॅकिंग करून ही फळं पाठवली जातात.
वाशिम- शेलू बाजार रोडवर शेताजवळच स्टॉल लावूनही शेतकरी याची विक्री करतात. शंभर ते दीडशे रुपये किलोप्रमाणे या फळाला दर मिळतात. हे फळ महाग असले तरी सेंद्रीय पद्धतीने उत्पादन घेऊन नैसर्गिकरित्या पिकवलेले असल्याने हनुमान फळाला चांगली मागणी असते. विठ्ठलराव बरडे यांचा अनुभव बघून या गावातील आणखी शेतकऱ्यांनी हनुमान फळाची लागवड केलीये.इतर पारंपरिक पिकांपेक्षा यातून चांगला नफा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.
सीताफळापेक्षा याचा आकार मोठा असतो, बिया कमी असतात, गर जास्त असतो, चवीला अत्यंत गोड असते. बरडे सांगतात तसं हे जंगली फळ आहे, मात्र शास्त्रज्ञांनी यावर संशोधन करून ते शेतात फळपीक म्हणून लागवडीसाठी विकसित केले, या गावात आणखी सात शेतकऱ्यांनी याची लागवड केली आहे. बरडे यांच्या शेतात सात प्रकारचे सीताफळ लावलेली आहेत. याला पाणी देण्याची गरज नाही, लागवडीनंतर सुरवातीला एक दोन वर्ष विदर्भा सारख्या उष्ण भागात फक्त उन्हाळ्यात एक दोन वेळा अत्यल्प पाणी द्यावे लागते. एकदा झाड मोठं झालं की पाणी देण्याची गरज नाही. उन्हाळ्यात या झाडाची पूर्ण पानगळ होते. व पावसाळ्यात पुन्हा पालवी फुटते, ही फळं हिवाळ्यात विक्रीसाठी येतात.