साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील वाकी रस्त्यालगतचे रहिवासी तथा शासकीय आश्रमशाळा जोंधनखेडा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक डिगंबर दगडू पाटील (डी.डी. पाटील) यांना नुकतेच आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.डी. पाटील त्यांच्या पत्नी सुनंदा पाटील यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी एस.पी.तडवी, जी.आर.कोळी, के. पी. ठाकरे, डी. टी. पाटील, श्रीमती येवले, आर. एस. उगले, गुलाब तडवी, सचिन तडवी, मंगतार पवार, गणेश पवार, मेहमूद तडवी यांच्यासह शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
डी.डी. पाटील यांनी आपल्या २७ वर्षाच्या सेवेमध्ये मुख्याध्यापक म्हणून शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लाल माती, रावेर, जोंधणखेडा, बंधारे ता.नवापूर व आंबे अशा विविध ठिकाणी आदर्श शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविले आहे. जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ, पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर वाचनालय, अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्था, स्वाभिमानी ज्येष्ठ नागरिक संघ, जय बजरंग व्यायाम शाळा अशा विविध संस्थेचे ते संस्थापक-अध्यक्ष आहेत. महालक्ष्मी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव आहेत.
सत्काराला उत्तर देताना डी.डी.पाटील म्हणाले की, ३५-४० वर्षांपूर्वीचे दहावीचे मुले, विद्यार्थी एकत्र येऊन गुरुजनां प्रति व्यक्त केलेली कृतज्ञतेच्या भावनेने भारावून गेलो आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन भव्य दिव्य सोहळा आयोजित केला. बालपणी निरागस असलेल्या चेहरे आज अनुभव पूर्ण दिसले. माझे विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर कार्यरत राहून कर्तव्य पूर्ण विविध पदावर जबाबदारीने काम करीत आहेत. हीच माझ्या कार्याची पावती समजतो, असे सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.डी. पाटील यांनी मत व्यक्त केले.