साईमत, बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील जामठी येथील श्रीमती चि. स. महाजन माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचे मुख्याध्यापक के. आर. पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ६२ वे राज्यस्तरीय अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या फैजपूर नगरीत जे.टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेज याठिकाणी १८ व १९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
जळगाव जिल्ह्यातून जामठी माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचे मुख्याध्यापक के. आर. पाटील यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार त्यांना कार्यक्रमात महामंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब जे. के. पाटील, सचिव शांताराम पोखरकर, अधिवेशनाचे अध्यक्ष विजय पाटील, शिक्षक आ.ज्ञानेश्वर म्हात्रे, नाशिक विभागाचे शिक्षक आ. किशोर दराडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार दिला जातो. जिल्हा व तालुकास्तरावर जामठी येथील मुख्याध्यापक के.आर.पाटील यांचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गातून कौतुक होत आहे.