साईमत, चोपडा : प्रतिनिधी
सध्याचे केंद्र सरकार कामगार विरोधी ४ कामगार संहिता लादत आहेत. त्याला कामगारांचा विरोध आहे. या संहिता अदानी आणि अंबानी या दोन प्रमुख उद्योगपतींना समोर ठेवून तयार केल्या आहेत. कामगार संहिता नोकरीची शाश्वती पेन्शन आदी मूलभूत विचारांना थारा नाही. कामगार संघटना आणि संघर्षाला मर्यादा आणणारे आहेत. भाजप सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. शेतीमालाला रास्त भाव दहा वर्षात दिले नाहीत. ते पुढेही मिळतील, अशी शक्यताही नाही. त्यामुळे येत्या २०२४ मधील निवडणुकांमध्ये भाजपा सरकारला सत्ता मिळण्यापासून दूर ठेवा, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ.प्रा.राजू देसले यांनी केले. चोपडा येथे आयटकच्यावतीने घेतलेल्या प्रचंड कामगार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड अमृत महाजन होते.
प्रास्ताविकात अमृत महाजन यांनी कोरोना कालावधीत जनता भीती व आरोग्य संकटात सापडली होती. तेव्हा फक्त अंगणवाडी, ग्रामपंचायत, आशा, आरोग्य कर्मचारीच त्यांचा जीव धोक्यात घालून मदत करत होते. त्याच कर्मचाऱ्यांना सरकार योग्य वेतन, पेन्शनपासून वंचित ठेवत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.
१८ डिसेंबरला कामगारांचा महापडावात सहभागी व्हा
गेल्या दहा वर्षापासून सत्तेवर असलेल्या मोदी सरकारने आपले अपयश जागण्यासाठी धार्मिक अजेंडा पुढे करून हिंदू धर्म संकटात आहे, अशी आवई उठविणे सुरु केले आहे. महाराष्ट्र आयटकने कामगार, कष्टकरी, शेतकरी, महिला वर्ग यांना जागृत करण्यासाठी कोल्हापूर ते नागपूर जनजागरण यात्रा काढली असल्याची माहिती देऊन केंद्र व राज्य सरकार यांनी कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावा. म्हणून नाशिक येथे १८ डिसेंबर रोजी यात्रेचा समारोप महापडाव आंदोलनाने होणार आहे. त्यात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र आयटकचे अध्यक्ष सचिव कॉम्रेड श्याम काळे यांनी सभेचा समारोप करताना केले आहे. कोल्हापूरपासून सुरु झालेली जनजागरण यात्रेचे नव्या दिवशी जळगाव जिल्ह्यात आगमन झाले. त्यावेळी चोपडा २८ नोव्हेंबर रोजी गांधी चौकात जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार घालून नगर वाचन मंदिरात ग्रामपंचायत, अंगणवाडी, शेतमजूर, शेतकरी यांची प्रचंड सभा घेण्यात आली. सभेत लक्ष्मण शिंदे, वासुदेव कोळी, ममता महाजन, मिनाक्षी सोनवणे, सदाशिव निकम उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी केले.
सभेला इरफान मण्यार, श्री.गायकवाड, आरिफ शेख, ममता महाजन, वत्सला पाटील, संध्या पाटील, लता पाटील, पुष्पावती मोरे, वैशाली पाटील, राजश्री मोरे, सुरेखा पाटील, प्रतिभा पाटील, नर्मदा कोळी, सुनिता कांखरे, दिव्यशरी कोळी, महाजन प्रकाश रल यांच्यासह चोपडे तालुक्यातील खेड्यापाड्यातून ४०० कर्मचारी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांची उपस्थिती होती. जनजागरण यात्रेनिमित्त जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात १० प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.