नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संविधान दिनाचे औचित्य साधून उद्या (२६ नोव्हेबर) सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होईल. या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयात बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याची प्रदीर्घ कालावधीपासून रखडलेली मागणी मार्गी लागणार आहे.
वकिलाच्या वेशभूषेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात राज्यघटना असा हा पुतळा आंतरराष्ट्रीय किर्तीचे मूर्तीकार नरेश कुमावत यांनी तयार केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य इमारतीमध्ये हा पुतळा बसविण्यात येणार असून यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. आंबेडकरांचा पुतळा सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात असावा यासाठी सातत्याने मागणी सुरू होती. सुप्रीम कोर्ट आर्ग्युइंग कौन्सेल असोसिएशनने यासाठी सरन्यायाधीशांना पत्र पाठविले होते.
राष्ट्रपतींच्या हस्ते होणाऱ्या या अनावरण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाच्या २०२२-२३ या वर्षासाठीच्या अहवालाचे प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते होईल. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने सुरू केलेल्या व्हर्चुअल जस्टिस क्लॉक, ईएससीआर या डिजिटल उपक्रमांचे देखील राष्ट्रपती उद्घाटन करतील. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायाधीश संजय किशन कौल, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आदिश सी. अग्रवाल, महाधिवक्ता आर. वेंकटरमणी तसेच कायदा मंत्री (स्वतंत्र कार्यभार) अर्जुन राम मेघवाल यावेळी उपस्थित राहतील.