साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील घाट रोड छाजेड ऑइल मिल मागील जमजम किराणासमोर वार्ड क्रमांक १५ मधील रस्त्यावरील नगरपरिषदेची पाईपलाईन गेल्या कित्येक महिन्यांपासून लिकेज आहे. लिकेजमुळे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने मलेरिया, डेंग्यू सारख्या आजाराला आमंत्रण देत आहे. हा लिकेज बंद करावा, अश्या आशयाचे लेखी निवेदन परिसरातील नागरिकांनी अनेकदा न.पा.च्या अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यांना केवळ आश्वासन दिले जातात.
निवेदन कचरा कुंडीत टाकत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेवर केला आहे. अशा समस्या संदर्भात या भागातील माजी नगरसेवकांना अनेकदा सांगूनही ते लक्ष देत नाही, अशी माहिती नागरिकांनी दिली. नगरपरिषद येथे प्रशासक बसल्याने माजी नगरसेवकांच्या तक्रारी नगरपरिषदेमध्ये अधिकारी, कर्मचारी ऐकत नसल्याचा आरोप या भागातील संतप्त नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या वार्डाला कोणी वाली आहे का? बेवारस वार्ड आहे, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे आता या समस्यावर आजी-माजी नगरसेवक कितपत लक्ष देतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.