साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर आणि बोदवड या दोन्ही तालुक्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून तहसीलदारांचे प्रभारी राज आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रभारी राजमुळे जनता त्रस्त झाली आहे. जनतेची ससेहोलपट थांबावी व त्यांना न्याय मिळावा, यासाठी दोन्ही तालुक्यांना कायमस्वरूपी तहसीलदार मिळावेत, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲॅड.रोहिणी खडसे- खेवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना शासकीय कामांसाठी व विविध योजनांसाठी प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. बोदवड तालुका निर्मितीपासून बोदवड येथे तहसीलदारपदी सातत्याने प्रभारी राज सुरू आहे. आता त्याच धर्तीवर मुक्ताईनगर तहसील कार्यालयातही सद्यस्थितीत तहसीलदारांचे पद रिक्त असून प्रभारीराज सुरू आहे. दोन्ही ठिकाणी तहसीलदारच नसल्याने जनसामान्यांची कामे होण्यास विलंब होत आहे. नागरिकांना दाखले काढण्यासाठी शेतीच्या नोंदी काढणे संदर्भात विलंब लागत आहे. तसेच शेती विषयक समस्या सोडविणे संदर्भात इंदिरा गांधी अर्थसहाय्य योजना, श्रावण बाळ योजना यासारख्या शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी अडथळे निर्माण होत आहे. इतकेच नव्हे तर रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणे अथवा धान्य मिळणे आदी कामांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. त्यामुळे नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.
एका कामासाठी नागरिकांना शेतातील हातची कामे सोडून वारंवार तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे त्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. यापूर्वी तहसीलदार मिळावा म्हणून बोदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलनही केले होते. आंदोलनाची शासनाने आजपर्यंत दखल घेतलेली नाही. त्यामुळे बोदवड व मुक्ताईनगर दोन्ही ठिकाणी तहसीलदारांची कायम नियुक्ती करुन जनसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ॲड.रोहिणी खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.