साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील नरवेल-म्हैसवाडी रस्त्याची अत्यंत दयनीय दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरून पायी चालणेही अवघड झाले आहे. रस्त्याच्या पुर्ननिर्माणबाबत तसेच आळंद फाटा ते हरणखेड रस्ता नुतनीकरण करून रस्त्यावरील पुलांची उंची वाढविण्याची व देवधाबा रस्त्यावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सा.बां. विभागाचे उपकार्यकारी अभियंता सचिन तायडे यांच्याकडे शुक्रवारी, २४ नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
नरवेल-म्हैसवाडी हा रस्ता एक कि.मी.चा आहे. दोन्ही गावांना जोडणारा दुवा आहे. रस्त्याचे पुर्ननिर्माण करावे तसेच आळंद फाटा ते हरणखेड रस्ता नुतनीकरण करून रस्त्यावरील पुलांची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने रस्त्यावरील पुलांची उंची वाढविण्यात यावी, देवधाबा रस्त्यावरील हिंगणाकाझी नजीकच्या पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधण्यात यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदन देतेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजणे, शहरप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, विश्वनाथ पुरकर, शांताराम धाडे, युवासेना शहरप्रमुख पवन गरुड, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.