साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील जुन्या पोलीस वसाहतीच्या जागेत निर्माण होत असलेल्या नवीन प्रांत व तहसील कार्यालयाच्या इमारत बांधकामाची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांनी नुकतीच पाहणी केली. याच इमारतीच्या शेजारी सर्व शासकीय कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शहरातील जुनी पोलीस वसाहत येथे मंत्री अनिल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुर केलेल्या ११ कोटी निधीतील अमळनेर तालुका तहसील व प्रांत कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे काम प्रगतीपथावर आहे. सर्व सुविधायुक्त व भव्य अशी इमारत होत आहे. कामाची पाहणी मंत्री पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केली. यावेळी काही सूचनाही त्यांनी अधिकारी वर्गास दिल्या. दरम्यान याच प्रांत व तहसील इमारतीच्या शेजारी लवकरच अमळनेर शहरातील सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी एकाच छताखाली यावेत, म्हणून प्रशासकीय इमारतीसाठी सुमारे १४ कोटी निधी मंजूर झाले आहे. या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकामही लवकरच सुरू होईल, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.
दोन्ही नव्या इमारती जनतेसाठी वरदान ठरणार
दोन्ही इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ सर्वच शासकीय कार्यालये एकाच प्रांगणात येणार असल्याने नागरिकांना शासकीय कामे करण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबणार आहे. परिणामी वेळेची व पैशाची बचत होऊन सर्वसामान्य लोकांचे श्रम वाचणार आहे. यामुळे दोन्ही नव्या इमारती अमळनेर तालुक्यातील जनतेसाठी वरदान ठरणार आहेत. पाहणीप्रसंगी बाजार समितीचे संचालक भोजमल पाटील, पं.स.चे माजी सभापती श्याम अहिरे, एस.टी. कामगार नेते एल.टी. पाटील, व्यापारी सेलचे अध्यक्ष विजय जैन, महेश पाटील, प्रा.सुनील पाटील आदी उपस्थित होते.