संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या मनोहर उर्फ मामा भोसले (वय ३९, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला बारामतीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी पाच दिवस (१६ सप्टेंबरपर्यंत) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
शुक्रवारी (दि.१०) सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालपे येथील एका फार्महाऊसवरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मनोहर भोसले याला ताब्यात घेतले होते. त्याला सायंकाळी उशीरा बारामती तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले. शनिवारी (दि.११) न्यायाधिशांपुढे त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
संत बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीची फसवणूक करण्यात आली असल्याची तक्रार आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी अटकेनंतर शनिवारी मनोहर भोसले याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अॅड. किरण सोनवणे यांनी तर भोसलेंकडून अॅड. विजय ठोंबरे यांनी काम पाहिले. भोसले यांचे अन्य दोन साथीदारांना अद्याप फरार आहे. मनोहर भोसले याच्याविरोधात तक्रारी देण्यासाठी नागरिक पुढे येवू लागले आहे. नागरिकांनी निर्भयपणे पुढे येत तक्रार दाखल कऱण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.