साईमत, जामनेर : प्रतिनिधी
अत्यंत धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात खरा आनंद देणारा काळ कुठला असेल तर तो बालपणीचा काळ आहे. आपली शाळा, आपलं गाव, आपले मित्र, जर हा काळ ओलांडला तर उरतात फक्त आठवणी. म्हणून म्हणतात ना गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. या बालपणीच्या आठवणी जागविण्याची इच्छा असलेल्या पाळधी गावातील तरुणांनी प्रचंड मेहनत घेऊन शाळेतील जुन्या आठवणी जागविण्याच्या निमित्त सर्वांना एकत्र करून पुन्हा एकदा मैत्रीची शाळा त्याच जागेवर भरविली ती म्हणजे क.द.नाईक माध्यमिक विद्यालय, पाळधी. बालपणी निरागस असणारे चेहरे आज मात्र अनुभव पूर्ण होते आणि प्रेरणा देणारी होते. आपलेच मित्र आज इंजिनिअर, आदर्श शेतकरी, पोलीस, डॉक्टर, व्यावसायिक झालेला पाहून खरंच मनाला आनंद देणारा होता.
पाळधी येथील क.द.नाईक माध्यमिक विद्यालयातील दहावीची बॅच २००६-२००७ च्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात शाळेतील जुन्या आठवणी ताज्या झाल्या.अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक के.एस.कळसकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य एम.के.बाविस्कर होते. स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थी प्रशांत चंदिले, डॉ.विशाल पाटील, भूषण सुशीर, विशाल पाटील, सत्तार तडवी, चंद्रभान इंगळे, कविता पाटील, पल्लवी पाटील, भारती धनगर या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.