साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील रांजणगावसह पंचक्रोशीचे आराध्य दैवत सद्गुरू माधवगिरी महाराज यांच्या संजीवन समाधीचा यात्रोत्सव शुक्रवारी, १७ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. त्यामुळे यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यानिमित्त गेल्या १० नोव्हेंबरपासून भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते. तसेच गुरुवारी, १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता ह.भ.प.पांडुरंग महाराज मालपूरकर (दोंडाईचा) यांचे जाहीर कीर्तन झाले.
यात्रोत्सवाच्या दिवशी म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ११ कावड मिरवणूक होईल. सकाळी ९ ते ११ ह.भ.प.वसंत महाराज धनगर यांचे काल्याचे कीर्तन होईल. ११.३० ते १२ महाआरती, महाआरतीनंतर दर्शनाला सुरवात होईल. यानंतर दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन केले आहे. ह्या वर्षीचे अन्नदान बाळासाहेब पंडितराव चव्हाण, प्रमोद वसंतराव चव्हाण (सरपंच, रांजणगाव) यांच्या परिवाराच्यावतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने केले आहे. तसेच रांजणगाव ग्रामपंचायतीच्यावतीने सर्व प्रमुख कामांसह साफसफाईच्या कामासाहित संपूर्ण तयारी केली आहे.
कावड मिरवणुकीच्या मार्गावर सर्वच ठिकाणी स्वच्छता केली आहे. तसेच गावातील प्रमुख चौक स्वच्छ करण्यात आले आहे. यात्रेत येणाऱ्या सर्व दुकान मालकांना जागा उपलब्ध करून दिली आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई लाईटिंग केली आहे. तसेच फुलांची सजावटही करण्यात येणार आहे. यात्रोत्सवात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाळणे व्यापारी आपआपले मोठे पाळणे, इतर सर्व नवनवीन पाळणे घेऊन दाखल झाले आहेत.
सर्व भाविक भक्तांनी श्री सद्गुरू माधावगिरी महाराजांचे संजीवन समाधी स्थळाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष जिभाऊ आधार पाटील, सचिव संजय बाळकृष्ण पाटे यांच्यासह रांजणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद चव्हाण तसेच माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या विद्या वाघ यांच्यासह उपसरपंच विजया खैरनार, ग्रामविस्तार अधिकारी दिलीप नागरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी केले आहे.