गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल मुंबईतील बैठकीत आ.मंगेश चव्हाण यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले

0
32
गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल मुंबईतील बैठकीत आ.मंगेश चव्हाण यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले-www.saimatlive.com

साईमत चाळीसगाव प्रतिनिधी

मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाची बैठक बुधवारी, 8 नोव्हेंबर रोजी पार पडली. बैठकीत गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्प व गिरणा डावा कालवा, मन्याड उजवा कालवा काँक्रीटीकरण प्रस्ताव विषयांच्या अनुषंगाने आ.मंगेश चव्हाण यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले.
अवर्षणप्रवण क्षेत्रात येणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पात यावर्षी 0 टक्के जलसाठा आहे. मन्याड प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील नांदगाव जिल्ह्यात माणिकपुंज प्रकल्प झाल्याने अपवाद वगळता मन्याड धरण कोरडेच राहिले आहे.

त्यामुळे प्रकल्पावर विसंबून असणाऱ्या 22 हुन अधिक गावातील शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर पर्याय म्हणून मन्याड प्रकल्पाच्या बाजूलाच असणाऱ्या गिरणा डॅम या मोठ्या धरणावरून कालव्याच्या साहाय्याने पाणी आणण्यात येऊन नदीजोड प्रकल्प करण्यात यावा, अशी गेल्या अनेक दशकांपासून मागणी आहे. मात्र, याबाबत प्राथमिक स्तरावर कार्यवाही झाली नसल्याने नदीजोड प्रकल्प केवळ स्वप्नवत राहिला आहे. यावर्षी चाळीसगाव तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ घोषित झाल्याने सिंचनासाठी व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची मोठी आवश्यकता निर्माण झाली आहे.

त्यामुळे गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी आ.मंगेश चव्हाण यांनी बैठकीत केली. त्यानुसार ना.देवेंद्र फडणवीस यांनी गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे सर्वेक्षण करून तात्काळ प्रस्ताव शासनाला सादर करण्याचा सूचना उपस्थित जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच गिरणा डावा कालवा व मन्याड उजवा कालव्याला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याने शेतकऱ्यांना एक ते दोन आवर्तन कमी मिळत आहेत. या संपूर्ण कालव्याची गळती रोखून पाणी बचत करण्यासाठी दोन्ही कालव्यांचे काँक्रीटीकरणाचे 70 कोटींचे प्रस्ताव राज्य शासनाकडे तापी पाटबंधारे विकास महामंडळाने पाठविले आहेत त्याला प्रशासकीय मान्यता देण्याची विनंती केली. त्याला ना.फडणवीस यांनी लवकरच प्रस्तावांना मान्यता देण्यात येईल, असे आश्वस्त केले.

गेल्या महिन्यातच जवळपास 500 कोटींचे वरखेडे प्रकल्प बंदिस्त पाईपलाईन कालव्याचे टेंडर जलसंपदा विभागाने प्रकाशित केले होते. त्यामुळे लवकरच बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू होणार आहे.चाळीसगाव तालुकावासीयांच्यावतीने ना.देवेंद्र फडणवीस व वरखेडे धरणाचे शिल्पकार ना.गिरीष महाजन यांचे आभार मानले.
आ.मंगेश रमेश चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here