साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील खडकी बु.ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या दुवामहल यासिनीनगर सबस्टेशन भागातील वार्ड क्रमांक ३ मध्ये सांडपाणी व घाणीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे मशिद भागातील गल्लीत डेंग्यू, मलेरिया, टाईफाईड, हिवतापासारख्या दहा ते बारा रुग्णांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दुवामहल परिसरात डेंग्यूचा कहर सुरु झाला आहे. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरात त्वरित स्वच्छता करुन फवारणी करण्याची मागणी जनतेतून जोर धरत आहे.
दुवामहल परिसरमधील गल्लीत मागच्या बाजूला राहत असलेले नासिरभाई यांच्या घराच्या आजूबाजूला सांडपाणी व परिसरात घाण वाढल्याने याभागात डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे चाळीसगाव शहरातील खासगी रुग्णालयात रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामपंचायत याभागात कधी स्वच्छता करत नाही. डासावर फवारणी करत नाही. सांडपाण्याचा बंदोबस्त करत नाही. फक्त नाले सफाई करणारा कर्मचारी कधी कधी दिसतो. कचऱ्याची गाडी दिसते. मात्र, फवारणी व सफाई वार्डात होत नाही. सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी वेळीच फवारणी व वार्डात सफाई करावी, अन्यथा तीव्र भूमिका वार्डातील ग्रामस्थ घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे याभागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.