मलकापूर : प्रतिनिधी
स्थानिक म्युनिसिपल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजला देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य डॉ. डी. एस. राठोड यांच्या हस्ते दोघांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांसह शिक्षकांकडून सामूहिक शपथही घेण्यात आली. शाळेच्या सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्रमाला संस्थेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.
‘राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी आम्ही स्वतःला समर्पित करू. तसेच देशवासियांमध्ये हा संदेश पोहचविण्यासाठी भरीव प्रयत्न करू, आम्ही ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहोत, जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे. तसेच देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता आम्ही स्वतःचे योगदान देण्याचा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहोत’, अशी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ समस्त विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली. याप्रसंगी शपथ वाचन क्रीडा शिक्षक आर.के.जाधव, एस. बी. निकम, व्ही. बी. सोनवणे यांनी केले. यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्षांसह मान्यवर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक ॲड. एस.एच. ठाकूर तर एस. आर. निवाणे यांनी आभार मानले.