मुंबई : प्रतिनिधी
“कृषिमंत्री असताना महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर केवळ राजकारण केले. ते अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते परंतु, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले”, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत केला. याला शरद पवारांनी आज, शनिवारी प्रत्युत्तर दिले आहे.ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
शरद पवार म्हणाले, “पंतप्रधानांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर कृषिखात्यातील माझ्या सहभागाबद्दल काही मुद्दे मांडले पण पंतप्रधान हे एक संवैधानिकपद आहे. संवैधानिक पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे,हे मला समजतें त्यामुळे मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे.मोदींनी सांगितलेली माहिती वास्तवापासून दूर आहे.
दहा वर्षातील कामाचा
दिला लेखाजोखा
“२००४ ते २०१४ मी कृषिमंत्री होतो. २००४ साली देशात अन्नधान्य टंचाई होती.तेव्हा पहिल्याच दिवशी मला कटू निर्णय घेत अमेरिकेकडून गहू आयात करायला लागला. २ दिवस मी त्या फाईलवर सही केली नव्हती. मी अस्वस्थ झालो होतो.त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा फोन आला.‘३ ते ४ आठवड्यात आपल्यासमोर अडचण उभी राहू शकते,’ असे त्यांनी मला सांगितले त्यामुळे मी सही केली, असे शरद पवारांनी म्हटले.
शरद पवारांनी पत्रकार परिषदेत काही मुद्यांचा उल्लेख करतांना,२००४ ते २०१४ मध्ये गहू, तांदूळ, कापूस, सोयबीनच्या हमीभावात दुपटीने वाढ केली असा दावा केला.
ऊसाची किंमत ७०० होती, ती २१०० रुपये केली.यूपीए सरकार असताना ‘नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन’ सुरू केले. यातून फळबाग आणि भाजीपाला उत्पादन वाढवले.२००७ साली आलेल्या ‘राष्ट्रीय कृषी योजने’मुळे कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला गेला.मत्सपालन वाढीसाठी राष्ट्रीय मत्सपालन बोर्डाची स्थापना केली.राबवलेल्या योजनांमुळे देश अन्नधान्याच्याबाबत स्वयंपूर्ण झाला.एकेकाळी आयात करणारा देश निर्यातदार झाला. २००४ ते २०१४ या काळात ७.७ अब्ज डॉलरवरून ४२.८४ अब्ज डॉलरची निर्यात करण्यात आली.माझ्या काळात शेततळ्याची योजना आणली.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ६२ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी देण्यात आली.पीक कर्जासाठी १८ टक्के व्याज आकारण्यात येत होते,ते ४ टयांवर आणले. काही जिल्ह्यात ० टक्के व्याज आकारले गेले.नियमित कर्ज फेडणाऱ्यांना सवलत दिली.
२०१२-१३ साली दुष्काळ पडला होता,तेव्हा चारा छावण्या उभ्या केल्या.माझ्या कार्यकाळातील कामाची दखल आंतरराष्ट्रीय संघटनांनी घेतली,अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.