साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील मुसळी गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन भावांना फायटर आणि दुचाकीच्या ब्रेकच्या वायरने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील मुसळी येथे भारत भागवत ठाकरे (वय २८) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती व मजूरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता भारत ठाकरे हा त्याचा भाऊ किशोर ठाकरे यांच्या सोबत घरी बसलेले होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून प्रवीण बुधा सोनवणे, संदीप बुधा सोनवणे, अजय बुधा सोनवणे, बुधा भुरा सोनवणे आणि उषाबाई बुधा सोनवणे (सर्व रा. मुसळी, ता.धरणगाव) यांनी फायटर आणि दुचाकीच्या ब्रेकच्या वायरने दोन्ही भावांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी बुधवारी, २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पाच जणांविरुध्द धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. विजय चौधरी करीत आहे.