साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील हनुमंतखेडे येथे किरकोळ कारणावरून एकाने दारूच्या नशेत वृध्द महिलेच्या डोक्यात लोखंडी कोयता मारून दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी बुधवारी, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, शांताबाई मंगल पवार (वय ६०, रा. हनुमंतखेडा ता.धरणगाव) ही वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गावात राहणारा सुकदेव गोपाल सोनवणे हा तिथे आला. दारूच्या नशेत त्याने ‘माझी पत्नी तुमच्या घरात आहे का’, अशी विचारणा केली. त्यावरून त्याला वृध्द महिलेने माझ्या घरात नसल्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने सुकदेव सोनवणे याने लोखंडी कोयता वृध्द महिलेच्या डोक्यात टाकून दुखापत केली.
त्यानंतर शांताबाई यांना तातडीने धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर वृध्द महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बुधवारी, २५ ऑक्टोबर रोजी सुकदेव सोनवणे याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ.राजेंद्र कोळी करीत आहे.