साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
एकीकडे सर्वत्र दसऱ्याचा उत्साह सुरू असतांना मध्यरात्रीनंतर शहर पुन्हा एका खुनाच्या घटनेने हादरले. शहरासह परिसरातील गुन्हेगारी हा चिंतेचा विषय झालेला आहे. पोलीस प्रशासनाने अनेक गुन्हेगारांना हद्दपार केले असले तरी गुन्हेगारी कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. यातच अलीकडच्या काळात खुनांची सुरू असलेली मालिका देखील कायम असल्याचे अधोरेखीत झाले आहे. दसऱ्याच्या रात्री शहरात दिलीप रामलाल जोनवाल यांचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आदील दस्तगिर खाटीक आणि साजिद सागिर खाटीक या दोघा चुलत भावांना अटक करण्यात आली आहे. यातील आदील हा याच घटनेत जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खून का बदला खून या वैमनस्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. चोविस वर्षांपुर्वी आदीलच्या वडीलांचा खून करणाऱ्या संशयितांमध्ये मयत दिलीप जोनवाल यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यातुनच ही घटना घडल्याची चर्चा आहे. खरे काय ते पोलिस तपासात पुढे येईल.
याबाबत माहिती अशी की, काल मध्यरात्रीनंतर पाऊण वाजेच्या सुमारास शहरातील गरूड प्लॉट परिसरात दोस्ती मंडळा जवळ क्रांती चौकात दिलीप रामलाल जोनवाल (वय ५३) रा. महात्मा फुले नगर, भुसावळ यांच्यावर मारेकऱ्यांनी प्राणघातक हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. काल नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्याने पोलीस प्रशासनावर आधीच ताण होता. यात या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घ्यावी लागली.
दरम्यान, गेल्या महिन्यात भुसावळात चार खून झाले होते. यात गुन्हेगार निखील राजपूत याच्यासह कंडारी येथील दोघांचा समाव्ोश होता. यानंतर खडका रोड परिसरात एकाचा खून झाला होता. या पाठोपाठ आता शहरातील मध्यवर्ती परिसरात दिलीप जोनवाल यांचा खून झाल्यामुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
या घटनेला पूर्व वैमनस्याची जोड असल्याचे समजते. तर मयत दिलीप जोनवाल हे माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची माहिती देखील समोर आली आहे. घटनेचे वृत्त समजताच शहर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर विभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत िंपगळे यांनी घटनास्थळी दाखल होत गुन्ह्याची माहिती जाणून घेतली. दरम्यान, खुनाच्या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एस. राजकुमार यांनीही घटनास्थळाला भेट दिली.
या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात आदील दस्तगिर खाटीक व साजिद सागीर खाटीक (रा. गवळीवाडा, भुसावळ) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत िंपगळे याच्या मार्गदर्शनात सुरु आहे. या प्रकरणी साजिद सागीर खाटीक यास अटक करण्यात आली असून आदील दस्तगिर खाटीक हा जखमी असून त्याच्यावर पोलीस देखरेखीत खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजते.
