साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या पर्वाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात साखळी उपोषण सुरु करण्याचे आवाहन केले. त्यानुसार चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव आणि शिरसगाव येथे सकल मराठा समाजाने साखळी उपोषणाला बुधवारी, २५ रोजी सुरूवात केली आहे.
मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभर मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे, आंदोलने केली असताना शासनाने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. संवैधानिक पध्दतीने अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गात सरसकट मराठा समाजाचा समावेश करण्यासाठी सलग १७ दिवस आमरण उपोषण केले. आमरण उपोषणाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन कुणबी प्रमाणपत्र १ महिन्यात देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज ४१ दिवस होऊनही मुख्यमंत्र्यानी दिलेले आश्वासन पाळले नाही, सरकार समाजाची दिशाभूल करत असल्याचे सांगत अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांनी महाराष्ट्रात मराठा समाजाने सर्कल वाईज साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव व शिरसगाव येथे सकल मराठा समाजाने साखळी उपोषणाला २५ पासून सुरूवात केली आहे. शासन आरक्षणाबाबत चालढकलपणा करत असल्याने मराठा समाजात राज्य सरकार विरोधात रोष वाढताना दिसत आहे. म्हणून महाराष्ट्रात अनेक गावामध्ये सत्ताधारी नेत्यांना गावबंदी केली आहे. तसेच आरक्षणासाठी गेल्या ८ दिवसात ४ मराठा समाज बांधवांनी आत्मबलीदान केले आहे. शासनाला जाग येत नसल्याने मराठा समाजात शासना विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचे कबुल केले असले तरी समाजाची दिशाभूल न करता मराठा समाजाला आरक्षण तात्काळ लागु करून मराठा समाजास न्याय देण्याची मागणी महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात येत आहे.
यांनी घेतला उपोषणात सहभाग
तळेगाव सकल मराठा समाजाचे गुणवंत शेलार, महेश शेलार, कल्याणराव देशमुख, सुदाम गोरे, संतोष देशमुख, निळकंठ देशमुख, महेंद्र शेलार, सुभाष पाटील, तुषार देशमुख, प्रकाश पाटील, निलेश देशमुख, उमेश भोसले, सुनील देशमुख, प्रवीण शेलार, शामकांत शेलार, शुभम देशमुख, नरेंद्र देशमुख, तेजस भोसले तसेच शिरसगाव येथील सकल मराठा समाजाचे दिलीप पाटील, मनोज चव्हाण, दिलीप युगराज पाटील, विशाल धनगर, रावसाहेब चव्हाण, वसंत चव्हाण ,सुरेश पाटील, प्रशांत बाविस्कर, राकेश पाटील, तन्मय पाटील, गोकुळ पाटील यांच्यासह परिसरातील असंख्य मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला आहे.