कवितांमधून बालकवी गोविंद पाटील यांनी फुलविले मुलांचे भावविश्व

0
15

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

बालसाहित्य हे सहज, सोपे वाटत असले तरी ते लिहिणे कठीण काम आहे. बालकांच्या पातळीवर बालसुलभ कथा, कविता लिहिणे म्हणजे मुलांचे भावविश्व फुलविणे. ‘मुलं जमिनीवरची तारे’ बाल-किशोर काव्यसंग्रहाच्या माध्यमातून बालकवी गोविंद पाटील यांनी कवितांमधून मुलांचे भावविश्व फुलविले असल्याचे प्रतिपादन खान्देशातील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. बी.एन.चौधरी यांनी केले. येथील भगीरथ विद्यालयात झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. मुलांचे मनोरंजन करणे म्हणजे भगवंताशी नाते जोडणे, असे पू. साने गुरुजी म्हणत. त्या परंपरेशी गोविंद पाटील यांनी नाळ जुळवली असल्याचे प्रा. चौधरी म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी सरस्वती पूजन करुन दीपप्रज्ज्वलन केले. प्रास्ताविकेतून काव्यसंग्रहाचे कवी गोविंद पाटील यांनी आपल्या कविता लेखनाचा प्रवास उलगडला. पद्मालय देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. ॲड. आनंदराव पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन केले.

ॲड. पाटील यांनी गोविंद पाटील यांना लोककलेचा वारसा त्यांच्या आजोबांकडून मिळाल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. संग्रहासाठी प्रस्तावना लिहिणारे सुप्रसिद्ध बालसाहित्यिक उध्दव भयवाळ, संभाजीनगर तसेच साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यिक आबा महाजन, साहित्यिक विलास मोरे यांचे पुस्तकातील अभिप्राय वाचन केले. यावेळी सुप्रसिद्ध चित्रकार तथा पुस्तकाचे मुखपृष्ठकार राजू बाविस्कर यांनी मुखपृष्ठ, आतील रेखाटणे यावर समयोचित मनोगत व्यक्त केले. समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी यांनी संग्रहाचे आस्वादक समीक्षण केले. ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण यांनी बालसाहित्य लिहिणे कठीण असल्याचे सांगितले. तसेच याप्रसंगी उपस्थित साहित्यिक डी.डी.पाटील (जामनेर), प्रकाश बाविस्कर (जळगाव), आनंदराव पाटील (तळई), रवींद्र पाटील (पाचोरा) यांनीही विचार व्यक्त केले.

गोविंद पाटील यांचे हे तिसरे पुस्तक आहे. समाज चिंतामणी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला जिल्हाभरातून लेखक, कवी, रसिक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कृष्णा शिंदे, योगेश जाधव, हेमंत रायसिंग, भानुदास पाटील (सामनेर) यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन ज्योती राणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here