तीन वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

0
13

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

शहरातील चाळीस बिघा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी, २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांनी गदारोळ केला होता.

मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथील आरोही राजेंद्र इंगळे या तीन वर्षीय चिमुकलीची प्रकृती खालावली होती. त्यामुळे चाळीस बिघा परिसरातील डॉ. राहुल चोपडे यांच्या रुग्णालयात दुपारी दोन वाजेच्या सुमारास तिला दाखल करण्यात आले. डॉ. रिया चोपडे यांनी तिला तपासल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी हलविण्याचा सल्ला त्यांनी नातेवाईकांना दिला. परंतु, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने नातेवाईकांनी याच रुग्णालयात उपचार करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान डॉ. रिया चोपडे यांनी आरोहीवर उपचार सुरू केले. मात्र, शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना अपयश आले. सायंकाळी सहा वाजेच्या तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गदारोळ केला. यावेळी परिसरात मोठी गर्दी जमली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here