अमळनेरच्या बालप्रेक्षकांनी लुटला बालनाट्याचा आनंद

0
46
अमळनेरच्या बालप्रेक्षकांनी लुटला बालनाट्याचा आनंद-saimatlive.com

साईमत अमळनेर प्रतिनिधी

लहान मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी नृत्य, नाट्य व संगीताच्या माध्यमातून सातत्याने कार्य करणाऱ्या नाट्यरंग थिएटर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बालनाट्याविषयी आवड जोपासावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून, ‘बालनाट्य प्रेक्षकांपर्यंत’ या उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये बालप्रेक्षकांसाठी बालनाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात येत आहेत.

या उपक्रमातंर्गत अमळनेर येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्यालयात गाठोड्याचं गुपित या बालनाट्याचे चार प्रयोग सादर झाले. एकूण १५०० विद्यार्थ्यांनी बालनाट्याचा आनंद लुटला. गाठोड्याचं गुपित या बालनाट्याची निर्मिती नाट्यरंग थिएटर्स जळगाव यांची असून अमोल ठाकूर यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हे बालनाट्य संस्कारक्षम असून गाठोड्यात लपलेल्या यंत्राद्वारे दोन विद्यार्थी जगण्यातील संस्कारांचे मूल्य बालप्रेक्षकांना समजावून सांगतात.

अभ्यासू, जिज्ञासू , प्रामाणिकपणा , शिस्तबद्धता, धाडसी वृत्ती या सर्व गोष्टी छोट्या छोट्या प्रसंगातून बालकलावंत शर्वा जोशी, केतकी कोरे , प्रणित जाधव बालप्रेक्षकांपर्यंत पोहचवतात. या बालनाट्याची रंगभूषा, वेशभूषा आणि नेपथ्य दिशा ठाकूर सांभाळतात तर पार्श्वसंगीत अथर्व रंधे आणि रंगमंच व्यवस्था पीयूष भुक्तार, अथर्व पाटील, प्रणव जाधव हे करतात. प्रयोगानंतर अमळनेर शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संदीप घोरपडे यांनी कलावंतांचे कौतुक केले.

तसेच मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. नाट्यरंग थिएटर्सद्वारे हे बालनाट्य जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये सादर होणार आहे, या उपक्रमाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यालयांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव अमोल ठाकूर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here