साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी येथील शेतकरी वीज महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे त्रस्त झाले आहेत. महावितरणचा ८ तास वीज देण्याचा निर्णय हा केवळ कागदावरच दिसत आहे. शेतासाठी सोमवार ते गुरुवार सकाळी ८ तास आणि शुक्रवार ते रविवार रात्री ८ तास वीज पुरविण्याचे वीज महावितरणचे नियोजन आहे. असे असताना प्रत्यक्षात मात्र सकाळी ८ तासाच्या विजेच्या वेळी महावितरणचे कर्मचारी याच वेळेला विजेचे काम करतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात वीज महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विचारपूस केल्यावर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे शेतकऱ्यांना मिळत आहे. विजेची अडचण असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा, असे वीज महावितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांना सांगत आहे.
यावर्षी पावसामुळे आधीच मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. उरलेसुरलेले थोडेफार पीक हे शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे वाढविले आहे. अशी पीके पाण्याअभावी करपत असल्याने शेतकऱ्यांचा जीव तुटत आहे. तसेच काही वेळा महावितरण वीज पुरवठा करीत असताना बऱ्याचवेळा लाईटही फॉल्टी असते तर काही वेळा कमी दाबाने वीज पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मोटारी जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला येऊन त्रस्त झाला आहे. वीज महावितरणने दिलेल्या वेळेनुसार शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने आणि क्षमतेने वीज पुरवठा न केल्यास शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात दिसून येत आहे. तसेच प्रत्येकवर्षी पाळधी गावातील शेतकऱ्यांना वीज महावितरण हेतुपुरस्कर तर त्रास देत नाही ना? असा प्रश्नही शेतकऱ्यांमधून उपस्थित होऊ लागला आहे.