स्तन कर्करोगाची लक्षणे दिसताच तपासणीला यावे : अधिष्ठाता डॉ. ठाकूर

0
32

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

स्तन कर्करोग संदर्भात जनजागृती महत्त्वाची आहे. लक्षणे दिसू लागताच रुग्णालयात येऊन तपासणी केली पाहिजे. त्याकरीता लवकर निदान, लवकर उपचार या सूत्रानुसार वेळीच कर्करोग निर्मूलन होऊ शकते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग निदान व संशोधन दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होत असतो. त्यानिमित्त हा अख्खा महिना “पिंक मंथ” म्हणून ओळखला जातो. हा पिंक मंथ ब्रेस्ट कॅन्सर झालेल्यांना समर्पित आहे. महाराष्ट्र शासनाने याविषयी जनजागृती हाती घेतली आहे. त्यानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शल्यचिकित्सा विभागातर्फे स्तन कर्करोग तपासणी अभियानअंतर्गत बुधवारी जनजागृती करण्यात आली.

यावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. राजेश जांभुळकर, डॉ. प्रशांत देवरे, उपक्रमाच्या नोडल अधिकारी डॉ. संगीता गावित उपस्थित होते.

अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी, आपल्या शरीराची वेळोवेळी तपासणी केली पाहिजे. जेणेकरून आपल्याला आजार उद्भवले असतील तर त्याची वेळेवर माहिती मिळून वेळीच उपचार करता येईल, असे सांगितले. यावेळी यंदा प्रवेशित झालेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ट पथनाट्य सादर करून त्यातून स्तनांच्या आजारासंदर्भात उपस्थित महिला व पुरुष नागरिकांमध्ये जनजागृती केली. त्याचबरोबर कनिष्ठ निवासी डॉ. सुनील गुट्टे आणि आंतरवासिता प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी पथनाट्यामधून, ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णाची तपासणी कशी केली जाते. स्तनांच्या आजारांची उपचार पद्धती कशी असते, याबाबत माहिती दिली.

यशस्वीतेसाठी डॉ. प्रज्ञा सोनवणे, समाजसेवा अधीक्षक प्रदीप पाडवी, राकेश सोनार, अभिषेक पाटील, प्रकाश पाटील आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविकातून डॉ. गावित यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी तर आभार डॉ. ईश्वरी भोंबे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here