भगीरथ शाळेत साने गुरुजी कथामालेचे उद्घाटन

0
34

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

साने गुरुजी हे मुला-फुलांचे कवी होते. लहान मुलांमध्ये ते लहान होऊन मिसळून जात. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारत होते. त्यांना गोष्टी सांगत होते. अशा मातृहृदयी गुरुजींच्या नावाने सुरु असलेली कथामाला गेली अनेक वर्षे अव्याहत सुरु ठेवणाऱ्या कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ शाळेला आणि कथामाला संयोजकांना धन्यवाद दिले पाहिजे, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रा. सी. एस.पाटील यांनी कथामाला उद्घाटनासह प्रथम पुष्प गुंफतांना केले. अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे होत्या.
ईशस्तवन, स्वागतगीत आणि साने गुरुजींची ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना संगीत शिक्षक राजू क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थिनींनी सादर केल्याने वातावरण निर्मिती छान झाली. प्रा.सी.एस.पाटील यांच्या कथाकथनाने मुले भारावली होती.

प्रमुख पाहुणे प्रा. पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन आणि सानेगुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कथामाला समितीच्या सदस्या सुनीता पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करुन देतांना वयाच्या ७० व्यावर्षी एम.ए.तत्त्वज्ञान विषयाची परीक्षा ८६ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. सी. एस. पाटील यांचे अभिनंदन केले.

प्रा.पाटील पुढे म्हणाले की, कथा किंवा गोष्ट ही लहान मोठ्या सर्वांनाच आवडते. पंचतंत्राचे लेखक पंडित विष्णु शर्मा यांनी पशु-पक्षी, प्राण्यांच्या गोष्टींच्या माध्यमातून धर्म, नीती, मूल्यशिक्षण, व्यवहारज्ञान अत्यंत प्रभावीरितीने शिकविले आहे. पंचतंत्रमधील कथा हा कथामालेचा प्रारंभ बिंदू म्हटला तर वावगे ठरु नये, असे सांगून त्यांनी दोन छोट्या कथा अत्यंत प्रभावी रीतीने सादर करुन विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले.

अध्यक्षीय भाषणात प्रिया सफळे म्हणाल्या की, चांगला प्रारंभ हे अर्धे यशाचे लक्षण असते. त्या दृष्टीने आपली कथामाला निश्चितच फलदायी होणार, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात कथामाला प्रमुख अशोक पारधे यांनी कथामालेची परंपरा व उद्देश विशद केला. सूत्रसंचालन आर.डी. कोळी तर अलका पितृभक्त यांनी स्वरचित कविता सादर करून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here