साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील साकरे गावातील एकाच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा ४९ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आले. याप्रकरणी मंगळवारी, १७ ऑक्टोबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, शकील गुलाब खाटीक (वय४८, रा. साकरे, ता. धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १५ ऑक्टोबर रोजी ९ वाजता त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री बंद घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत लोखंडी पेटीतून १२ हजारांचा रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकुण ४८ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. त्यानंतर शकील खाटीक यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक दीपक पाटील करीत आहे.