साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर
येथून जवळील पाचोरा तालुक्यातील सर्वे येथील माहेरवाशिण शुभांगी पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड केली आहे. शिवसेना राज्य कार्यकारिणीचा १५ ऑक्टोबर रोजी विस्तार करण्यात आला. विस्तारात नाशिक विभागातून शिवसेनेच्या धडाडीच्या महिला नेत्या तथा उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख शुभांगी पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यांना उपनेतेपदी पदोन्नती दिली आहे. शिवसेनेत उपनेते पद हे मोठे व जबाबदारीचे पद आहे. शुभांगी पाटील यांच्या मागील कार्याचा लेखाजोखा पाहता त्यांनी गेल्यावर्षीच नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातून ज्या प्रकारे निवडणूक लढवली आणि त्या दुसऱ्यास्थानी राहिल्या. तसेच त्यानंतरही त्यांचा पक्षातील कामाचा धडाका, जिद्द, चिकाटी व परिश्रम पाहता त्यांना पदावर नियुक्त केले आहे.
शुभांगी पाटील ह्या शिक्षक नेत्या आहे. त्यांना शिक्षकांचे मोठे पाठबळ आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांव्यतिरिक्त समाजकारणातून त्यांच्या मागे सामान्य जनतेचा व तरुणांचा मोठा पाठिंबा आहे. या नियुक्तीबाबत त्यांच्या पदाची घोषणा करुन शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी मोबाईल फोनवरून शुभांगी पाटील यांना याबाबत कळविले.
उत्तर महाराष्ट्रात अशाप्रकारे एका महिला पदाधिकाऱ्याला पहिल्यांदाच उपनेतेपद दिले आहे. त्यामुळे धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांमधून नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे सोमवारी, १६ रोजी धुळे येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात निवडीबद्दल फटाक्यांची आतिषबाजी करत व पेढे वाटून समर्थकांनी जल्लोष साजरा केला. या निवडीबद्दल धुळे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अशोक धात्रक यांनी फोनवरून तर धुळे जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, महानगर प्रमुख धीरज पाटील, माजी आमदार प्रा.शरद पाटील यांच्यासह तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभांगी पाटील यांचे कौतुक केले आहे.