साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेला आ.मंगेश चव्हाण यांनी अचानक भेट देत तेथे विद्यार्थ्यांना मिळत असलेले निकृष्ट जेवण व विद्यार्थ्यांच्या ढासळलेल्या गुणवत्तेची बाब उघडकीस आणून राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. त्याची जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन,. मंत्री ना. अनिल पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना तातडीने ठेकेदारावर दंडात्मक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घटनेच्या अनुषंगाने पंचसूत्री कार्यक्रम घोषित केला आहे. त्यात केवळ चाळीसगाव निवासी शाळाच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा वसतिगृहे येथे पुढील काळात तो राबविला जाणार आहे.
त्यात विशेष बाब म्हणून चाळीसगाव येथील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यामार्फत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यासाठी दहा लाख रुपये जिल्हा नियोजन समितीकडून मिळणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता प्रगती तपासण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचे, दर्जेदार व पौष्टिक भोजन मिळावे, यासाठी विशेष उपाययोजना राबवून त्याचा नियमित आढावा घेतला जाणार आहे.
शेकडो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासह शैक्षणिक भविष्यावर परिणाम करणाऱ्या महत्वाच्या बाबींकडे आ.मंगेश चव्हाण यांनी लक्ष वेधल्याने केवळ जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात मोठी जागरूकता निर्माण झाली आहे. प्रसार माध्यमांनी त्याची विशेष दखल घेतली. तसेच समाज माध्यमे, फेसबुक, युट्युबवर याबाबत चर्चा होऊन आ.मंगेश चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.