आई वडिलांशिवाय घराला वैभव नाही -ना.गिरीश महाजन

0
23

साईमत जळगाव प्रतिनिधी

डॉ. अविनाश आचार्य आणि संघाच्या प्रेरणेने केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रकल्प उभे झाले. या वृद्धाश्रमात गरीब लोक नव्हे, तर उच्चभ्रु , मध्यम वर्गातील लोक येतात. ज्या आई-वडिलांनी कष्ट करून, खस्ता खाऊन मुलाला हजार कोटीचे मालक बनवले असे मुलं, सूना, आई-वडिलांना वागवत नाहीत. आई वडिलांशिवाय घराला वैभव नाही. त्यावेळी मुलांकडील पैसे, वैभव काय कामाचे, अशी खंत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. ते रविवारी मातोश्री आनंदाश्रम नवरचनेचा व गौराई आरोग्य उपचार केंद्र लोकार्पण सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते.

निवांत व निसर्गरम्य वातावरणात असलेल्या मातोश्री आनंदाश्रमाला रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त नवीन भव्य रूप यावे असे ठरले. त्यासाठी जैन उद्योग समुहाने पुढाकार घेतला. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या नवरचनेच्या ध्यासाने मातोश्री आनंदाश्रमाला नवे रूप मिळाले. संपूर्ण आनंदाश्रमाचे नूतनीकरण, कांताई बहुउद्देशीय सभागृह आणि गौराई आरोग्य उपचार केंद्र उभारणी तसेच विविध घटकांचा विकास करण्यात आला.

आयोजित सोहळ्यास व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, सेवादास दलूभाऊ जैन, जैन समूहाचे अशोक जैन, केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख भरतदादा अमळकर, मातोश्री आनंदाश्रमाच्या प्रकल्पप्रमुख अनिता कांकरिया उपस्थित होते.
ना. महाजन पुढे म्हणाले की, उपेक्षित तसेच गरजू घटकांना आधार देणे अशा लोकाभिमुख उपक्रमांचाही केशवस्मृती विस्तार करताना दिसत आहे. अशा कामांसाठी आपल्या उत्पन्नातील काही वाटा खर्च करावा, यापेक्षा मोठे समाधान नाही. दातृत्वाबद्दल ना. महाजन यांनी भवरलाल जी जैन, आर. सी. बाफना व डॉ. अविनाश आचार्य यांची आठवण काढली. मूकबधिर, गतीमंद मुलांचा सांभाळ करून त्यांना शिकवणे, वाढीस लावणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. ‌‘केशवस्मृती’ वर्षांनुवर्ष निरंतर सुरू आहे याविषयी त्यांनी आवर्जून सांगितले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात जैन इरिगेशनच्या कार्याचा उल्लेख करत, ज्या कोरोना काळात मदत करण्याची इच्छा असूनदेखील मदत करता येत नव्हती. अशा कठीण परिस्थितीमध्ये जैन परिवाराने उदात्त भावनेने दररोज पाच हजार लोकांना जेवण देण्याचे मोठे कार्य केले आहे. आता आनंदाश्रम नवरचनेचा व गौराई आरोग्य उपचार केंद्र करिता पुढाकार घेतला हे भवरलाल भाऊ यांचे संस्कार अशोक भाऊ व जैन परिवाराने यांनी पुढे चालविलेले आहेत. डॉ. अविनाश आचार्य यांच्या विविध सेवा कार्याचा उल्लेख करत ते म्हणाले की, मुलांनी नाकारलेल्या आई वडिलांना समावून घेण्याचे काम मातोश्री आनंदाश्रम करत आहे. हे रोपटे कै. डॉ. अविनाश आचार्य यांनी लावले, याचे आज मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले. वृद्धाश्रमात अतिशय चांगल्याप्रकारे वृद्धांना सेवा मिळत आहे. त्यांच्या निवासाची उत्तम सोय केली आहे हे केशव स्मृती प्रतिष्ठानाचे मोठे समाज कार्य असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले की, आनंदाश्रमाचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. 25 टक्के काम महिनाभरात पूर्ण होईल. या ठिकाणी 100 आजी-आजोबा राहतील. त्यांचे जीवन या ठिकाणी सुखी व समाधानी राहील, अशी व्यवस्था व रचना आहे. श्रध्येय मोठ्या भाऊंच्या संस्कार, शिकवणीतून जैन इरिगेशन सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमी पुढाकार घेता राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर म्हणाले की, आचार्य दादांनी काम करताना माणसांची टीम उभी केली होती. डॉ. आचार्य आज आपल्यात नाहीत, पण आम्ही दहाजण मिळून नक्की डॉ. आचार्य आहोत. समूहाच्या हातून दादांचे नाव खाली जाईल, अशी कृती झाली नाही आणि होणार नाही, सेवेतील ही माणसे दीपस्तंभासारखे आहेत.

अनिता कांकरिया यांनी प्रास्ताविक केले. सूसंचालन संध्या कांकरिया यांनी, तर आभार प्रदर्शन सुनील पाटील यांनी केले. या कार्यक्रमास जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या सह जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here