साईमत, जळगाव : प्रतिनिधी
लहान भावाला दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी पाठवून ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी (१६, रा. विठ्ठल पेठ) या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
आई-वडील व लहान भाऊ यांच्यासोबत विठ्ठलपेठ परिसरात राहणारी ट्विंकल चौधरी ही इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी तिची आई नातेवाईकांकडे शिरपूर येथे गेली होती, तर वडील शेतात गेले होते. त्यावेळी दुपारी ट्विंकल ही लहान भाऊ दीपक याच्यासोबत घरीच होती. दुपारी अडीच वाजता तिने लहान भावाला दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी पाठविले व तिने राहत्या घरात गळफास घेतला. थोड्या वेळाने लहान भाऊ घरी आला. त्यावेळी त्याला बहिणीने गळफास घेतल्याचे दिसले. हे दृष्य पाहून त्याने आरडाओरड केल्याने शेजारच्या मंडळींनी तेथे धाव घेऊन ट्विंकलला खाली उतरविले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणी करुन मुलीला मयत घोषित केले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्याचे नेमके कारण समोर आले नसले तरी मुलगी गेल्या काही दिवसांपासून तणावात होती, असे सांगितले जात आहे. तिच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.