शिंदाडला प्रवेशद्वाराच्या बांधकामाला समाजकंटकांचा विरोध

0
30

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

तालुक्यातील शिंदाड गावातील गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार (कमान) बांधकामासंदर्भात प्रलंबित विषयावर अनेकवेळा संघटना आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देवून दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे शासन निर्णय पुढे करत टाळाटाळ आणि काही समाजकंटकांनी कमानीला विरोध केल्यामुळे समता सैनिक दलासह ग्रामस्थांतर्फे निवेदनाद्वारे निषेध नोंदविला आहे. अशा आशयाच्या निवेदनाच्या प्रती पं.स.चे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच तहसीलदार, पोलीस निरीक्षक, प्रांताधिकारी, शिंदाड ग्रामपंचायत आदींनाही रवाना केल्या आहेत.

ज्या ठिकाणी महामानवांचा सन्मान होत नसेल अशा ठिकाणी आमचे पुनर्वसन करावे, आमचे पुनर्वसन न झाल्यास प्रशासकीय दालनात संसार मांडू, त्यामुळे निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी, अशी निवेदनाद्वारे विनंती केली आहे. निवेदन देतेवेळी समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे, तालुका प्रचारक शांताराम सपकाळे, शिंदाड येथील ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ता संतोष तांबे, विजय तांबे, दशरथ तांबे, देवानंद सांबळे, अनिल तांबे, अंकुश तांबे आदी उपस्थित होते.

निवेदनाचा १५ दिवसांच्या आत गांर्भीयपूर्वक विचार करुन व कमानीचे बांधकाम अजून रखडल्यास तीव्र जनआंदोलन लोकशाही मार्गाने उभे करण्यात येईल. होणाऱ्या परिणामास ग्रामपंचायत, पंचायत समिती व या प्रकरणांशी निगडीत जबाबदार अधिकारी राहतील. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी गाव सोडण्याची आणि  पुनर्वसन होण्याची मुभेची मागणी केली आहे. ही घटना निषेधार्थ असून सामाजिक भावना दुखावणारी आहे. तीव्र मानसिक वेदना देणारी आहे. ज्या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान होत नसेल आणि त्यांच्या कमानीला जर जातीय हिनतेच्या नजरेतून बघितले जात असेल तर हे सामाजिक सन्मानांसाठी योग्य नाही म्हणून येत्या २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here