साईमत, मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यविरोधात ईडीने दाखल केलेल्या भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला आहे. यापूर्वी खडसे यांना न्यायालयाने अंतरीम जामीन मंजुर केला होता. आजच्या सुनावणीत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने नियमित जामीन मंजुर केला आहे. एकनाथ खडसेंचे वकील मोहन टेकावडे यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.
काय आहे भोसरी जमीन घोटाळा..
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महसुल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. ३.१ कोटी रुपये िंकमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करत सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी पुण्यातील बंड गार्डन पोलिसांत खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
अखेर सत्य जगासमोर आले
माझा न्यायालयावर विश्वास होता. अखेर सत्याची बाजू समोर आली. माझा लढा सुरूच राहील. उशिरा न्याय मिळाला असला तरी खरे काय ते जगासमोर आले आहे. केवळ राजकीय सुड भावनेतून मला आणि माझ्या कुटूंबाला त्रास झाला. माझा न्यायालयावर विश्वास आहे. यापुढील निर्णयही सत्याच्याच बाजुने लागेल.
– आ.एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते
