साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील रोटरी क्लबच्यावतीने तालुक्यातील उत्तमनगर आदिवासी बहुल पाड्यावर बुधवारी, ११ रोजी विनामूल्य आरोग्य तपासणीसह गरजूंना मोफत औषधी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात पाड्यावरील २०० च्यावर रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात १२० लहान बालके, कुपोषित बालके आणि गर्भवती महिलांची संख्या लक्षणीय होती.
चोपडा तालुक्यातील ग्रामीण भाग हा आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी वैद्यकीय सेवा मिळणे जिकरीचे असल्याने रोटरीच्या वतीने ‘आनंद क्षण’ नावाने वैद्यकीय शिबिर घेण्यात आले. त्यात तपासणी, मोफत औषधी वाटपासह रक्ताची तपासणी करण्यात आली. शिबिरासाठी डॉ. नीता जैस्वाल, डॉ.पराग पाटील, डॉ.भूषण सोनवणे, डॉ. सचिन कोल्हे, डॉ.वैभव पाटील यासह स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहकार्य लाभले. संपूर्ण औषधी रोटरीचे माजी सचिव प्रवीण मिस्तरी यांच्या साई फार्मा यांच्याकडून देण्यात आली.
शिबिराचे आयोजन रोटरीचे अध्यक्ष चेतन टाटीया, सचिव अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख डॉ. नीता जैस्वाल, प्रकल्प सहप्रमुख प्रदीप पाटील आदींनी केले होते. आदिवासी पाड्यावर गरजूंना लाभ मिळाल्याबद्दल आदिवासी बांधवांनी रोटरीचे आभार मानले.