साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बिलखेडा शिवारातील शेतात कापसाच्या पिकावर सरदार ॲग्रो फर्टीलायझर ॲण्ड केमीकल कंपनीचे रासायनिक खत मारल्याने शेतकऱ्याचे सुमारे सहा लाख रूपयांचे नुकसान होवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी, ९ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या जबाबदार तीन जणांविरुध्द धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, सुकलाल बंडू भदाणे (वय ६५, रा. बिलखेडा ता.धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे बिलखेडा शिवारातील शेत गट नंबर २०५ मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी कापसाची लागवड केली आहे. कापसाच्या वाढीसाठी त्यांनी गेल्या २५ जुलै रोजी सरदार ॲग्रो फर्टीलायझर ॲण्ड केमिकल कंपनीचे खत कापसाच्या पिकांवर मारले होते. या रासायनिक खतामुळे सुकलाल भदाणे यांच्या कापसाच्या पिकांचे नुकसान होवून सहा लाखाचे नुकसान झाले आहे. कंपनीने दिलेल्या खतामुळेच पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कंपनीच्या जबाबदार व्यक्ती ओम धर्मेशभाई वैष्णव, धर्मेशभाई मोहनभाई वैष्णव, जयश्रीबेन धर्मेशभाई वैष्णव (तिघे रा. राजकोट, गुजरात) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहे.