५ राज्यांत निवडणुका जाहीर,३ डिसेंबरला निकाल

0
8

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबर आणि राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानुसार, एकाच टप्प्यात मिझोरममध्ये ७ नोव्हेंबरला आणि तेलंगणात ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांचे निकाल ३ डिसेंबरला लागणार आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, या राज्यांमध्ये एकूण १६.१४ कोटी मतदार आहेत. यामध्ये ८.२ कोटी पुरुष आणि ७.८ कोटी महिला मतदार असतील. यावेळी ६०.२ लाख नवीन मतदार प्रथमच मतदान करणार
आहेत.
कोणत्या राज्यात किती जागा
राजस्थान-२००, मध्यप्रदेश -२३०, छत्तीसगड -९०, तेलंगणा -११९, मिझोराम- ४० जागांसाठी निवडणुक होत आहे.
गत निवडणुकीत शेवटचा निकाल ११ डिसेंबरला लागला होता. २०१८ मध्ये राजस्थानमध्ये ७ डिसेंबर, मध्य प्रदेशात २८ नोव्हेंबर, तेलंगणात ७ डिसेंबर आणि मिझोराममध्ये १८ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले. तर छत्तीसगडमध्ये १२ आणि २० नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले. ११ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले.
आदित्य ठाकरे यांचा
निवडणूक आयोगाला सवाल
मध्य प्रदेश, राजस्थानसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या संबंधित निवडणूक आयोगाने आजच घोषणा केली. पण त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रश्न विचारला आहे. देशात पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या गेल्या. मात्र,चंद्रपूर आणि पुणे लोकसभेची पोटनिवडणूक का जाहीर करण्यात आली नाही, हे मला जाणून घ्यायचं आहे. या दोन्ही जागा सहा महिन्यांहून जास्त काळ रिक्त असल्या तरी निवडणूक आयोगाने निवडणुका का घेतल्या नाहीत असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here