साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
आजचा युवक भरकटलेल्या अवस्थेत जगत आहे. त्याला शिक्षणातील अभ्यासक्रम व गुण म्हणजे पराविद्या याशिवाय ध्येय निश्चिती, संघर्ष, शौर्य, आव्हाने, आत्मसन्मान, संवेदनशीलता, कर्तव्य, प्रामाणिकपणा, निर्भीडपणा, एकाग्रता ह्या अपराविद्यासह चांगल्या गुणांची आवश्यकता आहे. हे सर्व गुण विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद, शिवाजी महाराज, डॉ. अब्दुल कलाम, संत गाडगेबाबा, सावित्रीबाई फुले व इतर अनेक संतांच्या चरित्राच्या वाचनातून मिळतील. यासाठी स्वतःमधील न्यूनगंड कमी करून स्वतःच्या भाग्याचे शिल्पकार व्हावे. यासाठी आजच्या तरुणांनी खऱ्या अर्थाने जागे होण्याची गरज असल्याचे मत मॅनेजमेंट गुरु प्रशांत पुष्पल (पुणे) यांनी व्यक्त केले. रामकृष्ण मिशन आश्रम छत्रपती संभाजी नगर यांच्या सहकार्यातून रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्थेद्वारे शहरातील चार महाविद्यालयातून सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख ध्येय निश्चिती कशी करावी, विषयावर मौलिक मार्गदर्शनपर व्याख्यानाचे सत्र आयोजित केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
शहरातील नानासाहेब य.ना. चव्हाण महाविद्यालय, श्रीमती शांतीदेवी चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज, जुलालसिंग मंगतू राठोड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स व के. के. सी. कॉमर्स कॉलेज येथे आयोजित व्यवसायाभिमुख मार्गदर्शन व्याख्यान सत्र घेण्यात आले. व्याख्यानानंतर त्यावर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले. अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वामीजी व पाहुण्यांचे असते स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी सेवा संस्थेचा कार्यकर्ता आशिष भावसार याने राज्यसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत यश प्राप्त केल्याबद्दल त्याचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दोन दिवसीय कार्यक्रमात चारही महाविद्यालयातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला. व्याख्यानानंतर अनेकांनी मौलिक मार्गदर्शन लाभल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यासाठी प्राचार्य एस. आर. जाधव, डॉ.प्राचार्य एम. व्ही. बिल्दीकर, प्राचार्य अभिषेक देशमुख, प्राचार्य नितीन बागुल, डॉ.प्रा.राजेंद्र निकम, उपप्राचार्य वसईकर यांच्यासह सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमानिमित्त आलेल्या वाहन पुस्तक पिढीतून सुमारे दहा हजार रूपयांच्या पुस्तकांची पुस्तके विद्यार्थी व शिक्षकांनी खरेदी केली. यशस्वीतेसाठी रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीचे हेमंत साळी, रमेश जानराव, मिलिंद देशमुख, एल. डी. पाटील, हर्षल आंबेकर, दत्तात्रेय असलेकर, राजेंद्र चौधरी, भूषण पाटील, प्रशांत साळी, सागर ढगे, आदित्य साळी यांनी परिश्रम घेतले.