शोभायात्रेने विद्यापीठाच्या ‘युवारंग’ महोत्सवाला प्रारंभ

0
25

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय ‘युवारंग’ युवक महोत्सवास शनिवारी, ७ ऑक्टोबर रोजी शोभायात्रेने प्रारंभ झाला. शोभायात्रेस विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विनोद पाटील आणि के.सी.ई.सोसायटीचे व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य डॉ. शिल्पा बेंडाळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरवात झाली. यावेळी विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, ॲड. अमोल पाटील, डॉ.शिवाजी पाटील, डॉ.पवित्रा पाटील, डॉ.सुरेखा पालवे, नितीन झाल्टे, अधिसभा सदस्य सर्वश्री विष्णू भंगाळे, दीपक पाटील, नितीन ठाकूर, स्वप्नाली काळे, अमोल मराठे, डॉ.संदीप नेरकर, ऋषीकेश चित्तम, महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे, ॲड.प्रवीणचंद्र जंगले, प्राचार्य ए.आर.राणे, प्राचार्य गौरी राणे, प्रा.जयेंद्र लेकुरवाळे, प्रा.जुगलकिशोर दुबे, डॉ.मनोज महाजन आदी उपस्थित होते.

महोत्सवासाठी मुळजी जेठा महाविद्यालयात तरूणाई दाखल झाली आहे. शनिवारी, ७ रोजी सकाळी १० वाजेपासून संघाचे आगमन व नोंदणी युवक महोत्सवात दुपारपर्यंत १०० महाविद्यालयांची नोंदणी झाली. सायंकाळी उशिरापर्यंत नोंदणी सुरू होती. महोत्सवात ४७५ विद्यार्थी, ७१४ विद्यार्थिंनी सहभागी होणार आहेत. याशिवाय पुरूष व महिला संघ व्यवस्थापक, साथ संगत देण्यासाठी सहकारी व विद्यार्थी सहभागी असतील. विद्यार्थी-विद्यार्थिनी, संघव्यवस्थापक, संगीत साथीदार अशा १ हजार ५९५ नोंदणी केली असून अनेक संघ दाखल झाले आहेत.

शोभायात्रेची सुरुवात मोठ्या उत्साहाने झाली. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रसंगानुरुप निरनिराळ्या वेशभुषेत सहभाग घेतल्याचे दिसून आले. भारतीय संस्कृतीचे विविध पैलूंचे संस्कृतीचे दर्शन बघावयास मिळाले. त्यात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी विविध संस्कृतींचे दर्शन घडविले. तसेच विविध विषय हाताळीत आपले सादरीकरण केले. त्यात नुकत्याच झालेल्या जी २० परिषदेचा विषय हाताळतांना विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून येत होता. महिलांना ‘संसदेत आरक्षण’ विषयाचे सादरीकरण करतांना महिलांविषयीचा आदर दिसून येत होता. शिवकालीन जागरण गोंधळ सादरीकरणात पारंपरिक संगीत आणि अभिमानाने उर भरुन यावा, असे अप्रतिम वेशभूषा केली होती. तसेच गाणी सादर करतांना उत्साह ओसंडून वाहत होता. भारताच्या समृध्दीसाठी वारीतून पंचप्रण विषयातही वेशभूषा सादर करुन भारताच्या समृध्दीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले. साने गुरुजींचे ‘खरा तो एकची धर्म’ हे प्रेरणादायी विचार आजच्या पिढीलाही प्रेरणादायी कसे आहेत, याची ग्वाही सादरीकरणात दिसून आली.

स्त्री-पुरुष समानतेचा विषय व त्याची आजची गरज लक्षात घेऊन उत्तम सादरीकरण करण्यात आले. अन्न, वस्त्र व निवारा याच गोष्टीचा विचार होऊन मोबाईल नको तेच बालपण देगा देवा अशी भूमिका तरुणाईने मांडली. बेराजगारी निषेध, कानबाई उत्सवातून लोक परंपरेचे दर्शन, सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि स्त्री शिक्षणावर भर, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, मतदार राजा जागा हो, आदिवासी संस्कृतीचे दर्शन आदी विषयांचा सहभाग नोंदवतांना गीत व वाद्यवृंदासह नागरिकांना आकर्षित केले. ही शोभायात्रा मुळजी जेठा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून सुरु होऊन नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात समारोप झाला.

महोत्सवाचा रविवारी उद्घाटन समारंभ

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने युवारंगाचा प्रारंभ होत आहे. महोत्सवाचे रविवारी, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी असतील. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष, के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष व विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य नंदकुमार बेंडाळे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष व विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक जैन, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे, व्य.प.सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील व के.सी.ई. सोसायटीचे व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, प्राचार्य संजय भारंबे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

विविध स्पर्धांचे रविवारी आयोजन

उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी खुला रंगमंच क्र.१ वर (कवयित्री बहिणाबाई चौधरी रंगमंच), दुपारी १ वाजता मिमिक्री तर सायंकाळी ४ वाजता मूकनाट्य, बंदिस्त रंगमंच क्र.२ वर (पद्मश्री ना.धो.महानोर रंगमंच), दुपारी १ वाजता भारतीय समुहगान बंदिस्त रंगमंच, क्र.३ वर (पूज्य साने गुरुजी रंगमंच) दुपारी १ वाजता वक्तृत्व स्पर्धा, बंदिस्त रंगमंच क्र.४ (भारतरत्न लता मंगेशकर रंगमंच) वर दुपारी १ वा. शास्त्रीय वादन (सुरवाद्य), शास्त्रीय वादन (तालवाद्य), शास्त्रीय गायन व बंदिस्त रंगमंच क्र.५ वर (कलामहर्षी केकी मुस रंगमंच) दुपारी १ वाजता स्थळ चित्र दुपारी ४ वाजता व्यंगचित्र अशा कला प्रकाराच्या स्पर्धा होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here