राजपूत समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका

0
19

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजपूत समाजाला जो शब्द दिला होता, त्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. गेल्या सहा दिवसांपासून राजपूत समाजाचे आमरण उपोषण सुरू आहे. राज्य सरकारने मागण्या त्वरित मान्य कराव्या. राजपूत समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका, असा गर्भित इशारा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

राजपूत समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी राजपूत समाजाचे गिरीशसिंह परदेशी व रोशनसिंह राजपूत यांच्यासह समाजबांधवांनी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण पुकारले आहे. आंदोलनाला जिल्ह्यातून मोठा पाठिंबा मिळत आहे. शनिवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्यासह काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांनी आंदोलनस्थळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी राजपूत समाजाच्या आंदोलनाला प्रदेश काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, राज्याच्या उभारणीत राजपूत समाजाचेही मोठे योगदान आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा समाज आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राजपूत समाजाच्या महासंमेलनात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजपूत समाजाच्या मागण्या मान्य करीत ‘भामटा’ शब्द काढण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची अद्यापपर्यंत अंमलबजावणी मात्र झालेली नाही. राज्यातील हे सरकार केवळ आश्वासने देत आहे. त्यावर कुठलीही अंमलबजावणी केली जात नाही. सहा दिवसांपासून राजपूत समाजाचे हे आमरण उपोषण सुरू आहे. राज्य सरकारने त्यांच्या संयमाचा अंत न पाहता त्वरित मागण्या मान्य कराव्या, असा इशाराही माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here