साईमत, जळगाव : प्रतिनिधी
एज्युकेशन टुडेद्वारा केलेल्या सर्वेक्षणातून बोर्डींग स्कूल श्रेणीत अनुभूती निवासी स्कूलचा महाराष्ट्रातील प्रथम तीन शाळांमध्ये समावेश झाला आहे. मुंबई येथे ललित येथे ४ ला झालेल्या शानदार पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ‘स्कूल मेरिट ॲवार्ड – २०२३’ ने स्कूलला सन्मानित करण्यात आले. अनुभूती स्कूलच्यावतीने ज्येष्ठ शिक्षक वेणू गोपाल वंगारा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
“एज्युकेशन टुडे” प्रतिष्ठीत मासिकाद्वारे १५ निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आली. एज्युकेशन टुडे सर्वेक्षण आणि ज्युरी टीम्सने सुरू केलेल्या विस्तृत रँकिंग सर्वेक्षणाच्या आधारे विविध शाळांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार दिले गेले. शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठीत असलेल्या एज्युकेशन टुडे सर्वेक्षणात अनुभूती निवासी स्कूलला प्रथम तीनमध्ये मानांकित करण्यात आले.
निसर्गाच्या सान्निध्यात शंभर एकर परिसरात विस्तारलेली अनुभूती स्कूल ५ वी ते १२ पर्यंत पूर्ण निवासी आहे. अनुभूतीत १६ वर्षापासून औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित सर्वांगीण विकास आणि भारतीय संस्कृतीचे संस्कारमूल्ये रूजविले जातात. ज्यामुळे स्पर्धायुक्त जगात अनुभूतीचे विद्यार्थी आपली वेगळी छाप सोडत आहे. अनुभूती स्कूलमध्ये १२ वेगवेगळ्या राज्यातून विविध संस्कृतीचे विद्यार्थी व शिक्षक असल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते. प्रत्येक सहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे उत्कृष्ट प्रमाण असल्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता उच्चतम राखली जात आहे.
व्यवस्थापनाच्या तळमळीमुळेच यश शक्य
शैक्षणिक अभ्यासक्रमासह विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत, अनुभवाधारित शिक्षण देण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्थापनाची तळमळ यामुळेच हे यश प्राप्त करणे शक्य झाल्याचे मत अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन यांनी व्यक्त केले.