साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर
येथे गेल्या २ ऑक्टोबर रोजी पडलेल्या दोन घरावरील दरोड्यातील दरोडेखोरांचा तपास अद्याप लागलेला नाही. मात्र, दरोड्यातील खाली बॅगा व कपड्याचा तपास लावण्यात योगायोगाने एका शेतकऱ्यास यश आले आहे.
सविस्तर असे की, भडगाव तालुक्यातील कजगाव येथील देशमुख आणि चव्हाण या दोन कुटूंबाच्या घरी २ ऑक्टोबर रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. त्यात सोन्या- चांदीसह रोकड मिळून पाच ते सात लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबविला होता. गेल्या पाच दिवसांपासून दरोडेखोरांचा पोलीस कसून शोध घेत आहे. मात्र, तपास लावण्यात पोलिसांना अद्यापही पाहिजे तसे यश मिळालेले नाही. या उलट दोन दिवसात तीन रस्ता लूट एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न तर वेगवेगळ्या कॉलनीमध्ये चोरांचे आगमन या पध्दतीने चोरटेच पोलिसांना आव्हान देत आहेत.
ओंकार चव्हाण यांच्याकडे २ ऑक्टोबर रोजी पडलेल्या दरोड्यातील बॅग व कपड्यांचा सामान शनिवारी, ७ ऑक्टोबर रोजी चव्हाण यांच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील कजगाव-पारोळा मार्गावरील पोपट अर्जुन चौधरी यांच्या शेतात शेत मालक कपाशीला पाणी भरण्यासाठी गेला होता. तेव्हा बॅग व सामान अस्ताव्यस्त फेकलेला दिसल्याने शेतकऱ्याने ही घटना कजगावच्या पोलीस मदत केंद्रावर कळविली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलीस पाटील राहुल पाटील आणि कजगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचाऱ्यांनी शेतात जाऊन बॅग व सामानाचा पंचनामा केला.