सोशल मीडियाच्या काळात अगदी घरगुती कामांना पण ग्लॅमरस लुक आल्यामुळे अनेकजण जेवण बनवण्याकडे आपला मोर्चा वळवतात. यापैकी काहींना खरोखरच जेवण बनवायची आवड सुद्धा असते पण जेवण बनवणं म्हणजे फक्त वेगवेगळ्या पद्धतीने फोडण्या देणं नाही. स्वयंपाकासाठी पूर्वतयारी ज्या व्यक्तीला वेगाने करता येते ती व्यक्ती खरी मास्टरशेफ म्हणता येईल. सुदैवाने हल्ली सोशल मीडियावर अशा अनेक सुगरणी सुद्धा आहेत ज्यांनी इतरांचे त्रास कमी करण्यासाठी पदार्थांची पूर्वतयारी कशी करावी याच्या टिप्स शेअर केल्या आहेत. आजची आपली टीप असणार आहे लसूण कसा सोलावा, याविषयी.
लसूण सोलताना अनेकदा नखं दुखू लागतात पण आज आपण अशा सहा पद्धती पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही ३० सेकंदात चक्क वाटीभर लसूण सोलू शकता.
१) चाकू वापरा: तुम्हाला चाकू आडवा धरून लसणाचा कांदा मोकळा करून घेता येईल आणि मग धारदार बाजूने लसणाच्या पाकळ्यांची फक्त टोकं उडवून टाका जेणेकरून लसूण पटकन सोलता येईल.
२) पाणी: तुम्हाला जर माहित असेल की आपल्याला जेवण बनवताना ठराविक प्रमाणात लसूण लागणार आहे तर मूळ स्वयंपाक सुरु करायच्या किमान १० मिनिट आधी लसणाच्या पाकळ्या पाण्यात भिजवा ज्यामुळे लसूण सोलताना फार वेळ लागणार नाही.
३) ठेचा: तुम्हाला जर लसूण फक्त फोडणीला वापरायची असेल तर कापत बसण्यापेक्षा छान पैकी घरातला वरवंटा घेऊन लसणीचा कांदा ठेचा ज्यामुळे सालं आपोआप निघू लागतील.
४) तवा किंवा मायक्रोव्हेव: थोडी उष्णता दिल्याने सालं निघून जाण्यास मदत होते. तुमच्याकडे मायक्रोव्हेह असेल तर त्यात किंवा मग चक्क लसूण तव्यावर भाजून मग तिची सालं अलगद काढू शकता. थोडं तेल सुद्धा लावू शकता जेणेकरून किचनमध्ये करपल्याचा वास येणार नाही.
५) बरणी: ही हॅक सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे, एखाद्या काचेच्या बरणीत (शक्यतो जिचे झाकण मेटलचे असेल) त्यात लसणाच्या पाकळ्या घालून बरणी वेगाने हलवा. घर्षणामुळे लसणाची सालं निघून जाण्यास मदत होते.
६) फ्रीजर: लसूण फ्रीजमध्ये ठेवून काहीवेळ थंड होउदे, यामुळे लसूण थोडी नरम होते ज्यामुळे तुम्ही पिळून सुद्धा लसणाचा गर काढू शकता