साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर परिसर तथा बांबरुड राणीचे परिसरातील आदिवासी भिल्ल समाज बांधवांना नवीन रेशन कार्ड मिळावे. यासाठी शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, तालुकाप्रमुख शरद पाटील यांनी पाचोरा तहसीलदार यांच्याकडे शुक्रवारी, ६ ऑक्टोबर रोजी दुपारी पाचोरा येथे प्रस्ताव सादर केले. यावेळी एकनाथ अहिरे, दत्तू अहिरे, संजय ठाकरे, नंदू पाटील, नाना वाघ, धरमसिंग पाटील आदी उपस्थित होते.
आदिवासी भिल्ल समाज बांधव हे मूळ रहिवासी आहेत. ते कष्ट करून उपजीविका भागवितात. तसेच ते भूमिहीन आहेत. ते शिक्षणापासून वंचित आहे. त्यांच्या जीवनात प्रचंड दारिद्य्र आहे. ते मतदार आहेत. ते नेहमी निवडणुकांमध्ये स्वयंस्फूर्तीने मतदान करतात. आजगायत ते रेशन कार्डापासून वंचित आहे. त्यांना शासनाच्या धान्य दुकानाच्या लाभापासून दूर ठेवण्यात आले आहे. हा अक्षम्य अपराध आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाचा बेजबाबदारपणा व त्यांच्याविषयी असलेली उदासीनता अत्यंत निंदनीय आहे. त्यांच्या हक्कावर गदा आणाला आहे. त्यांचा हक्क त्यांना मिळावा, उदरनिर्वाहासाठी अन्नधान्याचा पुरवठा व्हावा, त्यांना पोटभर जेवण मिळावे, अशा सामाजिक बांधिलकीतून वैशाली सूर्यवंशी यांनी तहसीलदार प्रवीण चव्हाणके आणि श्री. येवले यांची भेट घेऊन पिंपळगाव हरे., सामनेर, डोकलखेडा, वरसाडे, लासुरे आदी अनेक गावातील नवीन रेशन कार्ड व प्राधान्य अन्नपुरवठा योजनेअंतर्गत समावेश करण्यासाठीच्या प्रकरणांचे प्रस्ताव सादर केले. त्याच्यावर तातडीने निर्णय घेऊन आदिवासी भिल्ल समाज बांधवांना त्यांच्या हक्काचे रेशन कार्ड द्यावेत, अशी प्रमुख मागणी वैशाली सूर्यवंशी यांनी केली आहे.



