नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर माझी निवड योग्य नाही म्हणता, पण त्या पत्रावर तुमच्याच सह्या आहेत, असे ठणकावून सांगत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्या गटाला दिला आहे. निवडणूक आयोगाचा निकाल आपल्याच बाजूने लागेल मात्र निकाल काहीही लागला तरी चिंता करण्याचे कारण नाही. मी पाच निवडणुका वेगवेगळ्या चिन्हावर लढलो आणि निवडून आलो. चिन्हं बदललं तरी लोक आपला निर्णय बदलत नाही.आपण संघर्षाची भूमिका घेतलेली आहे आणि देशातलंही वातावरण बदलत आहे,असे म्हणत शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जान भरली.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या विस्तारित कार्य समितीची बैठक आज राजधानी नवी दिल्लीत झाली.दुसरीकडे निवडणूक आयोगात उद्या(शुक्रवारी) राष्ट्रवादी कुणाची यासंबंधीची महत्तपूर्ण सुनावणी होत आहे. त्याआधी या बैठकीनंतर शरद पवार यांनी पदाधिकारी-नेत्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अतिशय आक्रमक होऊन अजित पवार गट आणि भाजपला खडे बोल सुनावले.
देशातील वातावरण बदलतंय
आज अनेक राज्यात भाजपची सरकारे नाहीत. काही राज्यातील विरोधी पक्षाची सरकारे पाडून अनेक ठिकाणी भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. आता लोकसभेच्या निवडणुका येत आहेत.भाजपने ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांनाच सोबत घेतले आहे.त्यामुळे भाजपने आता त्यांच्या पक्षाचे कमळ हे चिन्ह बदलावे आणि वॉशिंग मशिन घ्यावे.आज आपण अनेक राज्यांवर नजर टाकली तर तिथे भाजप नाहीये. केरळ,पश्चिम बंगाल,पंजाब,ओडिसा अशी उदाहरणे देत देशातील वातावरण बदलतेय असे सांगून केंद्रात सत्ताबदल होईल, असे अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी सांगितले.
तपास यंत्रणांचा गैरवापर
काही वर्षांपूर्वी केंद्रीय तपास यंत्रणांची नावे देशातल्या लोकांना माहितीही नव्हती पण ज्या पद्धतीने भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू केलाय, त्यावरून विरोधी पक्षांना ते किती घाबरले आहेत, हेच सिद्ध होतंय. भाजपने ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून अनेक विरोधी पक्षातल्या नेत्यांना नाहक त्रास दिला, असा आरोप शरद पवार यांनी यांनी केला.
राष्ट्रवादी कोणाची?
आज सुनावणी
दरम्यान राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असतांना आज (शुक्रवारी) निवडणूक आयोगासमोर सुनावणी होऊन निकाल येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असून त्यांनी अजित पवार गट हा वेगवेगळा झाला असून पक्ष फुटलेल नाही अशी भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांची रराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्याच्या प्रक्रियेच्या वेळी अजित पवारांसह फुटीर आमदारांनी यावर शिक्कामोर्तब केला असल्यामुळे पवार गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
निकाल आपल्याच बाजूने लागेल
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर माझी निवड योग्य नाही, हे आता तिकडे गेलेले अनेक जण सांगत आहेत पण ते लोक हे विसरत आहेत की, माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या प्रस्तावावर त्यांंच्याच सह्या आहेत. मला विश्वास आहे की, निवडणूक आयोगाचा निकाल आपल्याच बाजूने लागेल,असे पवार म्हणाले.



