‘नली’ अन्‌‍ ‘अरे संसार संसार’ कार्यक्रमांनी रसिक मंत्रमुग्ध

0
48

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

परिवर्तन निर्मित ‘नली’ आणि ‘अरे संसार संसार’ कार्यक्रमांचे गुजरातमधील चैतन्य मराठी मंडळाच्यावतीने आयोजन केले होते. परिवर्तनचे हे कार्यक्रम राज्यभर व राज्याच्या बाहेर गाजत आहेत. गुजरातमध्ये तिथल्या मराठी मंडळांनी परिवर्तन जळगावची दखल घेत परिवर्तन महोत्सवासाठी परिवर्तनला आमंत्रित केले होते. त्यात ‘नली’ हा एकल नाट्यप्रयोग हर्षल पाटील यांनी अत्यंत समर्थपणे सादर करत रसिक प्रेक्षकांना हसविले आणि रडवलेही. संपूर्ण सभागृह अंतर्मुख होऊन प्रयोगाला दाद देत होते. दुसऱ्या दिवशी १ ऑक्टोबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवर आधारित संगीतमय कार्यक्रम ‘अरे संसार संसार’ सादर केला.

परिवर्तनच्या कलावंतांनी ज्या पद्धतीने हा कार्यक्रम सादर केला. त्यामुळे दोन तास सभागृह आवाक होऊन बहिणाबाईच्या कविता व बहिणाबाईचा जगणे समजून घेत होता. बहिणाबाईची कविता ही केवळ कविता नाही तर तो जळगाव शहराचा खान्देश संस्कृतीचा आणि कृषी परंपरेचा इतिहास आहे, अशी प्रतिक्रिया सार्वत्रिक होती.

श्रद्धा कुलकर्णी, हर्षदा कोल्हटकर, अक्षय गजभिये, विशाल कुलकर्णी यांच्या गायनाने इतके विविध रंग भरले की, या संगीतमय मैफिलीने सर्व रसिक तल्लीन झाले होते. मंजुषा भिडे, हर्षल पाटील, नेहा पवार, समृद्धी पाटील, सोनाली पाटील यांच्या कविता वाचनाने बहिणाबाई उलगडून सांगितले गेले. यासोबतच तबल्यावरची मनीष गुरव यांची साथसंगत तर बासरीवरती योगेश पाटील यांनी एक सुंदर अनुभूती दिली. शंभू पाटील यांच्या निवेदनाने खास खान्देशी मेजवानी रसिकांना मिळाली. बडोदेकर रसिकांची दोन्ही प्रयोगांना मिळालेले ‘स्टँडिंग ओवेषण’ ही फार मोठी दाद ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here