साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत आणि शहापूरसह १७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक तर सात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. जामनेर तालुक्यात शेंदुर्णी, पहूर, नेरी, फत्तेपूर ही मोठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाची गावे आहेत. त्यापैकी पहुर पेठची ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. पहुर पेठ ग्रामपंचायतचे सरपंच पद अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव असल्याने प्रस्थापितांसह सत्ताधाऱ्यांच्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
जामनेर तालुक्यातील टाकळी बुद्रुक, गोंडखेल, शिंगाईत, गारखेडा, पहुर पेठ सोबत सामरोद, शहापूर, नांद्रा हवेली, कापूसवाडी तोरणाळे, पठाडतांडा, खडकी, नवीदाभाडी, गोरनाळे, एकुलती, दोंदवाडे अशा १७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर वाकोद, रोटवद, नांद्रा, हिवरखेडा तवा, वाकडी, सुनसगाव अशा सात ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी होऊ घातली आहे
पहुर पेठला अटीतटीचा सामना रंगणार
जामनेर तालुक्याची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या पहुर पेठ ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अटीतटीचा सामना रंगणार आहे. निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षात अटीतटीचा सामना होणार आहे. शिवसेना पक्षाचे नेतृत्व शहर प्रमुख संजय तायडे, विनोद पाटील, विनोद ठाकूर करीत आहे. भारतीय जनता पार्टीच्या पॅनलचे नेतृत्व जि.प.चे माजी सदस्य राजधर पांढरे, साहेबराव देशमुख, रामेश्वर पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व जि.प.चे माजी सदस्य प्रदीप लोढा करीत आहे. सरपंच पदासाठी शिवसेनेने चांगला उमेदवार दिल्याने सत्ताधारी प्रस्थापित नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकीत कोण बाजी मारतो? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे.
