साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
पाटणादेवी मंदिरावर जाण्यासाठी बारा वर्षापासून अद्यापही नदीवर पूल झालेला नाही. याकडे पुरातन विभाग मुद्दाम दुर्लक्ष करत आहे. मागीलवर्षी आ.मंगेश चव्हाण यांनी हे बघितल्यानंतर यासाठी निधी उपलब्ध करून दिला. परंतु पुरातन विभागाने त्याला मंजुरी दिली नाही. ते स्वतःही पूल करत नाही, यामागे त्यांचा काय उद्देश आहे. यासंदर्भात पाटणा ग्रुप ग्रामपंचायत आ.मंगेश चव्हाण यांना भेटले. त्यांनी पुलासाठी पुन्हा निधी उपलब्ध करून दिला. परंतु पुरातन विभागाच्या आडमुठे धोरणामुळे परवानगी मिळत नाही. पुरातन विभाग स्वतःही करत नाही. ते केवळ देवी जवळील पैसा, सोने, साड्या, ओटी जमा करण्यासाठी येतात आणि निघून जातात. गावातील नागरिकांनी कुठलीही जीवितहानी होऊ नये, म्हणून लोकांना जाण्यासाठी दोर बांधलेले आहेत. सिमेंट बोरी भरून ठेवलेली आहे. परंतु त्या वाहून जातात. याकडे पुरातन विभाग कधी लक्ष देणार. मोठी जीवितहानी झाल्यावर लक्ष देतील काय? असा प्रश्न आता भाविकांमधून उपस्थित होत आहे. पाटणादेवी डोंगरी नदीवरील पूल न झाल्यास प्रा. डी. ओ. नाना पाटील तांबोळे खुर्द (सध्या मुक्काम शशिकलानगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) यांनी जलसमाधी घेण्याच्या विषयावर ठाम निर्धार केला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी मंदिराकडे जातांना डोंगरी नदी पार ओलांडून जावे लागते. पावसाळ्यात व इतर ऋतुंमध्ये ज्येष्ठांसह बालक, वृध्द भाविकांना मंदिराकडे जाणे अत्यंत जीवघेणे ठरत आहे. पाटणाचे युवा सरपंच नितीन पाटील यांनी दिलेल्या निवेदनाचा गंभीर विचार शासकीय पातळीवर होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनातील सर्व संबंधित विभागाचे अधिकारी आणि पुरातत्व विभागाचे संबंधित सुस्त, ढेपाळलेले, निष्क्रीय अधिकाऱ्यांनी कर्तव्य सेवेची जाणीव ठेवण्याची गरज आहे. तसेच युध्दपातळीवर तातडीने रेंगाळलेल्या पुलाचे काम संयुक्तपणे मार्गी लावून भाविकांची होणारी गैरसोय व त्रास थांबविण्याची अपेक्षा आहे. युवा समाजसेवक सरपंच नितीन पाटील पाटणा गाव यांचा एकट्याचा विषय डोंगरी नदीवरील पुलाचा आहे, असा गैरसमज संबंधित अधिकाऱ्यांनी करून घेऊ नये. त्यामागे चंन्डिका मातेचे सर्व भाविक भक्तांचा अंतर्भाव आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व देवीचे भक्त व देशपातळीवरील भक्तांचा समावेश आहे.
पुलाचा निर्णय ११ ऑक्टोबरपर्यंत घ्यावा
सर्व देवीच्या भक्तांच्यावतीने नितीन पाटील हे प्रातिनिधीक स्वरूपात नेतृत्व करीत आहेत. त्याला सर्व भाविक भक्तांचे पूर्ण समर्थन व अनुमोदन आहे. येत्या ११ ऑक्टोबरपर्यंत पुलाचा निर्णय व बांधकामाला सुरूवात न झाल्यास सर्व देवीचे भक्त सामुदायिकरित्या जलसमाधी घेणार आहेत. त्यांचा हा पक्का निर्धार आहे. त्यामुळे ते मुळीच मागे हटणार नाहीत. त्यांच्यासह परिवाराच्या संभाव्य नुकसानीला महाराष्ट्र शासन आणि पुरातत्त्व विभागातील संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असे भाविकांनी नमूद केले आहे.
